महाराष्ट्र शासनाच्या पशु पैदास व संगोपन केंद्राच्या मालकीची राणी शिगांव (बोईसर) येथे १३ हेक्टर ४४ आर (३३ एकर) जमीन असून या सर्व जमिनीवर या परिसरातील रहिवाशांनी अतिक्रमण केले होते. वारंवार सुचना, नोटीसा पाठवूनही केलेले अतिक्रमण सोडत नसल्याने मंगळवारी पशुपैदास व संगोपन केंद्र पालघरचे कृषि अधिकारी संजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तामध्ये या जमिनीवरील सर्व अतिक्रमण हटविले.
महाराष्ट्र शासन पशुपैदास व संगोपन केंद्र पालघर यांच्या मालकीची पालघर जिल्ह्य़ामध्ये साडेतीन हजार एकर जमिन असून या जमिनीवर बहुतांशी ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी भात, भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची मशागत केली आहे. तसेच काहींनी झोपडय़ा बांधून अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम पशुपैदास विभागाने घेतली असून याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी राणी शिगांव येथील अतिक्रमण हटविण्यात आले.पालघर तहसीलदार, तीन पोलिस अधिकारी, २६ पोलिस कर्मचारी व पशुपैदास केंद्राचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये येथील ३३ एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविले अशी माहिती कृषि अधिकारी संजय ठाकरे यांनी दिली.