मुलांना वाढवताना पालकांना काही समस्या जाणवतात. त्या समुपदेशकाकडे जाण्याइतक्या गंभीर नसतात, पण त्यांना त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असते. पालकांच्या या मागणीला प्राधान्य देत महाराष्ट्र बालशिक्षण ठाणे शाखेतर्फे गेल्या वर्षांपासून (जून २०१४) एक उपक्रम ठाण्यात राबविला जातो. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ५.३० ते ७ या वेळेत पालक एकत्र जमतात आणि आधी ठरलेल्या विषयावर चर्चा करतात. पालकांच्या मागणीनुसार चर्चा, विचारांचे आदानप्रदान आणि त्यातून प्राप्त झालेले पर्याय असे शनिवारच्या या सत्राचे स्वरूप असते. मुलांचे खाणे असा विषय चर्चेला घेतल्यावर योग्य आहार, मुलांच्या आवडीनिवडी, मुले खळखळ का करतात, पौष्टिकतेला महत्त्व देत नव्या रंगरूपात पदार्थ कसे करावेत, मुलांचे अतिलाड न करता कलाकलाने कसे वळवावे इ. अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली, पर्याय सुचविले गेले. पुढच्या सत्रात ज्यांनी ते अमलात आणले त्यांनी आपले अनुभव सांगितले. आतापर्यंत मुले आणि टी.व्ही. (टी.व्ही. असावा की नसावा) मुले आणि अभ्यास, मुले आणि छंदवर्ग इ. मुलांना वाढवतानाच्या विविध विषयांवर चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद ठाणे शाखेतर्फे मूल पहिलीत जाताना! असा उपक्रम तीन सत्रांत (२२ फेब्रुवारी, १ मार्च आणि ८ मार्च) राबवला जाणार आहे. हल्ली बहुसंख्य शाळांमधून शिशुवर्गासाठी हसतखेळत शिक्षण पद्धत अवलंबली जाताना दिसून येते. पहिलीत गेल्यावर लिखाण, थोडासा गृहपाठ सुरू होतो आणि मग त्याच्याशी जुळवून घेताना मुलांना काही अडचणी येतात. अशा वेळी पालकही गोंधळून जातात. शिशुवर्गाचा टप्पा आणि प्राथमिक विभागाची सुरुवात यामध्ये सांगड कशी घालायची आणि विशेषत: पालकांची भूमिका कशी असावी, या दृष्टीने या उपक्रमांतर्गत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सत्रात पहिलीत जाताना या उपक्रमामागील हेतू विषद करून सांगितला जाईल. मुलांचे संगोपन करताना त्यांना जाणून घेण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत याविषयी या सत्रात मार्गदर्शन केले जाईल. स्पर्धेचे युग असले तरी प्रत्येक व्यक्ती टॉपर होणे शक्य नाही. त्यामुळे टॉपर होण्याचा अट्टहास न करता त्याच्यातील बलस्थानं आणि त्याच्यातील कमकुवत दुवे जाणून घेऊन त्याला पुढे नेण्याचा कसा प्रयत्न करावा, हे या सत्रात सांगितले जाईल. साधारणपणे या वयात मुलांची आकलन शक्ती सर्वाधिक असते. त्यामुळे या वयात त्यांना एखादी संकल्पना नीटपणे समजली आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. आपलं मूल, मुलाचा आवाका लक्षात घेऊन वाटचाल करायली हवी. त्याने सगळ्या स्पर्धेत, परीक्षेत, कार्यक्रमात अव्वलच असायला हवे या अट्टहासापायी त्यांची दमछाक होईल. त्यासाठी पालकांनी मुलांच्या दिनक्रमाची नीट आखणी करणे आवश्यक आहे. या बाबतीत सत्रात चांगले उपाय सुचविण्यात येतील. शिशुवर्गातून पहिलीत प्रवेश हा महत्त्वाचा टप्पा आहे. यात मुलास काही अडचणी जाणवत असतील, तर त्याला आश्वासक आधार देऊन, आम्ही बरोबर आहोत ही जाणीव करून देऊन नात्याची वीण घट्ट करायला हवी.
पहिल्या सत्राबरोबरच गणित विषयासंदर्भात रोहिणी रसाळ मार्गदर्शन करणार आहेत. गणिताची विशिष्ट भाषा असते. त्याचा वापर केल्यास त्याचीही मुलांना सवय होते. खेळाच्या माध्यमातून त्याची भीती कमी होईल आणि हळूहळू गोडी उत्पन्न होईल. भाषाविषयक सत्राचे मार्गदर्शन श्रद्धा सांगळे करणार आहेत. पालकांना मुलांना इंग्रजी जमेल की नाही याची धास्ती वाटत असते, पण या इयत्तेतील अभ्यासक्रम संभाषणावर भर देणारा आहे हे लक्षात घ्यायला हवे. इथेही खेळ प्लॅशकार्ड्स, बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके याचा उपयोग पालकांनी कसा करावा हे सांगितले जाईल. मुलांना बऱ्याचदा लिखाणाचा कंटाळा येतो. तेव्हा जबरदस्ती न करता संवादातून त्याला विषयासंदर्भात बोलते करावे. मग हळूहळू एकेक शब्द लिहिण्यास सांगावा. अशा तऱ्हेने मुलांच्या कलेने खेळातून, संवादातून त्याला लिखाणास उद्युक्त कसे करावे हे तज्ज्ञ सांगतील.
बदलत्या सामाजिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक परिस्थितीत पालकांचे सशक्त गट तयार होणे ही काळाची गरज आहे. गटचर्चेचा उपक्रम महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ५.३० ते ७ या वेळेत नौपाडा, हायवे सोसायटी, चंद्रनील अपार्टमेंट, गावंड पथ येथे राबवला जातो. पहिलीत जाताना हा उपक्रम २२ फेब्रुवारी, १ आणि ८ मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत राबविण्यात येणार आहे. संपर्क- कुमुदिनी बल्लाळ- ९८७००३६०५६. रोहिणी रसाळ-९६९९७७१२०८. विशाखा देशपांडे-९८२०९२६०५७.