वाट काढताना प्रवाशांची तारांबळ, रखडलेल्या पुलाच्या कामाचाही फटका

भाईंदर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाबाहेर पादचारी पुलाच्या कामाचे पडलेले सामान, अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकी यातून वाट काढताना आधीच प्रवाशांची तारांबळ उडत असताना या परिसरात फरीवाल्यांनीदेखील अतिक्रमण केले असल्याने गर्दीच्या वेळी यातून मार्ग काढताना प्रवाशांचे हाल होत आहेत.

भाईंदर स्थानकात विरारच्या दिशेने नवा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पुलासाठी भाईंदर पश्चिम येथील जुनी तिकीट खिडकी तोडण्यात आली. त्यामुळे हा परिसर सध्या मोकळा झाला आहे. तिकीट खिडकी तोडल्यानंतर रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना भरपूर जागा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु प्रवाशांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. या जागेत पादचारी पुलाच्या कामासाठी आणल्या गेलेल्या लोखंडी सळ्या पडल्या असून उरलेला परिसर चक्क फेरीवाल्यांनी व्यापला आहे. बाजूलाच रिक्षा स्थानकदेखील आहे. त्यातच रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेल्या सध्याच्या पादचारी पुलाजवळच दुचाकीसाठी स्टँड तयार झाला आहे. परंतु या दुचाकीदेखील कधीही शिस्तीने उभ्या न करता जागा मिळेल त्या पद्धतीने त्या उभ्या करून ठेवल्या जातात.

सकाळी व संध्याकाळी चाकरमानी तसेच व्यापारी वर्गाची भाईंदर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. मुंबईतला माणूस घडाळ्याच्या काटय़ावर धावत असल्याने नेहमीची लोकल गाठण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. अशातच फेरीवाले व दुचाकी यांचा या परिसराला विळखा पडला असल्याने यातून मार्ग काढताना प्रवाशांची अक्षरश: तारांबळ उडत आहे. रेल्वे स्थानकाला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अथवा राजकीय नेतेमंडळी भेट देणार असले की तेवढय़ापुरते फेरीवाले या परिसरातून बेपत्ता होतात. त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती होत असते.

आंदोलनाचा इशारा

प्रवाशांना भेडसावणारी ही समस्या ध्यानात घेऊन शिवसेनेचे भाईंदर पश्चिम येथील विभागप्रमुख जितेंद्र पाठक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काही दिवसांपूर्वीच रेल्वे मास्तरांची भेट घेऊन फेरीवाले हटविण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासनाने वेळीच या फेरीवाल्यांना दूर केले नाही तर शिवसेना अपल्या पद्धतीने आंदोलन छेडेल, असा इशारा पाठक यांनी दिला आहे.