चौदा कर्मचारी दोन दिवस विनावेतन

वारंवार आदेश देऊनही कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर प्रभावीपणे कारवाई होत नसल्याने संतापलेले महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी या भागातील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची विनावेतनाची सजा सुनावली आहे. फेरीवाल्यांची पाठराखण करीत असल्याचा ठपका असणाऱ्या दोन नियंत्रक अधिकाऱ्यांच्या वार्षिक वेतनश्रेणी रोखण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कल्याणमधील ‘क’ प्रभागातील चौदा कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रवींद्र गायकवाड यांच्यावर सोपविली आहे. कल्याणची जबाबदारी साहाय्यक आयुक्त कृष्णा लेंडेकर यांच्यावर आहे. नियंत्रक म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांनी कल्याणमधील ‘क’ प्रभाग व डोंबिवलीतील ‘ग’, ‘ह’ आणि ‘फ’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकांकडून फेरीवाले रस्त्यावर बसणार नाहीत याचे नियोजन करायचे आहे. हे दोन्ही अधिकारी नियंत्रक म्हणून नेमूनही फेरीवाले रस्ते, पदपथांवरून हटत नसल्याचे आयुक्त रवींद्रन यांच्या निदर्शनास आले होते.नियंत्रकाची नेमणूक करूनही फेरीवाले हटत नसल्याने आयुक्त संतप्त झाले आहेत. कल्याण पश्चिमेत रस्ते, स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा सतत राबता असतो.  तसेच, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात कुचकामी ठरल्याने ‘क’ प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील १४ कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची विना वेतनाची सजा ठोठावण्यात आली . या कारवाईबद्दल पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली

रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त व्हावा यासाठी रवींद्रन स्वत: प्रयत्नशील आहेत. असे असूनही कल्याण-डोंबिवली या दोन्ही स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांचा उच्छाद सुरू असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र  नाराजी आहे.  यापूर्वी लेंडेकर व गायकवाड या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. या दोन्ही अधिकाऱ्यांचे खुलासे समाधानकारक न आल्याने आयुक्तांनी त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.