22 September 2020

News Flash

पालघरमध्ये  मुख्य रस्त्यांवर ‘हातगाडी’ राज

पालघर नगर परिषद कार्यालयासमोरून पूर्वी बोईसरसाठी सहा आसनी रिक्षाचे वाहनतळ होते.

(संग्रहित छायाचित्र)

फेरीवाल्यांची मुजोरी; अपंग व्यक्तीवर विक्रेत्यांची ‘दादागिरी’

पालघरमधील मुख्य रस्त्यांवर सकाळ आणि सायंकाळच्या वेळी हातगाडय़ांनी कब्जा केला असून नगरपालिका कर्मचारी, नगरसेवक आणि राजकीय पुढाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे त्यांच्या ‘दादागिरी’ने कहर केला आहे. ‘ये धंदा करणे की जागाच है, पार्किंग की नाही’ असे सांगून पालघरच्या मुजोर हातगाडीवाल्यानी पालघर नगर परिषद कार्यालयासमोर चक्क एका दिव्यांग नागरिकाला हुसकावून लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालघर शहरात फेरीवाले, हातगाडी विक्रेत्यांनी व्यापले असून नागरिक त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत.

पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहरेच्या परिसरापासून मनोर मार्गावर सकाळी आणि सायंकाळच्या वेळी किमान १५०-२०० मीटर अंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले असते. नगर परिषद कार्यालय, भाजी मार्केट, बाजारपेठ आणि मासळी मार्केट याच पट्टय़ात असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याच्या कडेला गाडय़ा पार्किंग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या हॉकर, हातगाडी आणि जमिनीवर बसून वस्तू विक्रेत्यांकडून नगर परिषद बाजारकर वसूल करीत असल्याने या अनधिकृत विक्रेत्यांना ही जागा आपली असल्याचे वाटत असून त्यांच्याकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. या परिसरातील बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने वाढवून अतिक्रमण केले असून त्यांना आशीर्वाद आहे. गेल्या ५-६ वर्षांत पालघरमधील मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढायचे धाडस दाखविलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांना हुसकावून लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही.

पालघर नगर परिषदेच्या परिसरात विक्रीसाठी बसणाऱ्या काहींना काही दिवसांपूर्वी त्या परिसरात एक अपंग व्यक्ती आपल्या तीनचाकी वाहनासह उभा असताना या भागात वाहन उभे ठेवण्यास मज्जाव केला. ही जागा व्यवसाय करण्यासाठी आहे, वाहनाच्या पार्किंगसाठी नाही असे धमकावून सांगण्यात आले. दिव्यांग व्यक्तीने या संदर्भात विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूचे विक्रेते एकत्र येऊन आपण पोलीस, नगर परिषद आणि राजकीय मंडळींना हप्ते देत असल्याचे सांगून काय करायचे ते करा असेच थेट आव्हान दिले.

पालघर नगर परिषद कार्यालयासमोरून पूर्वी बोईसरसाठी सहा आसनी रिक्षाचे वाहनतळ होते. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाल्याने हे रिक्षा स्टॅन्ड मागे सरकविण्यात आले. नंतर त्याच ठिकाणी नगर परिषदेच्या गाडय़ा उभ्या राहू लागल्या. कालांतराने हे वाहनतळ मागे सरकविण्यात आल्यानंतर ही जागा पालघरबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी व इतर जागा अनधिकृत भाजी विक्रेते, हातगाडीवाले यांनी बळकावली आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. तीनआसनी आणि सहाआसनी रिक्षा स्टॅन्डने अनेक ठिकाणी आपले स्वघोषित स्टॅन्ड सुरू केले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यास कोणी पुढाकार घ्यावा हा प्रश्न पुढे येत आहे.

नगर परिषदेचे दुर्लक्ष

पालघर नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी ‘ना फेरीवाला क्षेत्र’ जाहीर केले आहे. मात्र आपल्याकडे या क्षेत्रातील अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही अशी सबब पुढे ठेवण्यात येत आहे. पालघरच्या सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांची ‘मिलीजुली’ असून नागरिकांना भेडसावणारऱ्या समस्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.

एखाद्या दिव्यांग व्यक्तीसोबत झालेली बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नगर परिषद कार्यालयासमोर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते हे वस्तुस्थिती आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडावी, शहरातील अतिक्रमण काढावे असे मी अनेकदा मुख्याधिकारी यांना  सांगिलते आहे. यासाठी पाठपुरावा करू.

– उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघर

फेरीवाले आणि रस्त्याकडेला बसणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नगर परिषदेचे पथक आहे. पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असून बंदोबस्त मिळाल्यास अतिक्रमण आणि फेरीवाले अशा दोन्ही विरोधात कारवाई करू. दिव्यांग नागरिकाला उद्धटपणे बोलणारऱ्या फेरीवाल्याचा शोध घेऊन कारवाई करू.

– प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 2:33 am

Web Title: hawkers on main roads in palghar
Next Stories
1 ‘काळीपत्ती’ परवडेना
2 अरुंद फलाट, निमुळते मार्ग, अतिक्रमण!
3 नायगाव पूल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला!
Just Now!
X