09 March 2021

News Flash

शहर शेती : वृक्षवल्लींचा शेजार, आरोग्याला आधार

वनस्पतींचा हिरवा पाचूसारखा रंग हा समृद्धी व चैतन्याचा रंग आहे. भारतीय परंपरेत वनस्पतींचे अन्न सोडून इतरसुद्धा अत्यंत महत्त्व आहे.

| January 22, 2015 01:16 am

tvvish09सर्वच विचारवंत, संत, महंत यांना वृक्षाखाली अनुभूती झाली, ज्ञान प्राप्त झाले. यात वड, पिंपळ, आंबा इ. वृक्ष प्रामुख्याने आहेत. त्यांच्या सावलीत बसून त्यांना स्पर्श करून आपण आपले शारीरिक व मानसिक आजार व विकार घालवू शकतो, तर वनस्पतीच्या स्पर्शामध्ये मनात बदल घडवून आणण्याची क्षमता असते.

वनस्पतींचा हिरवा पाचूसारखा रंग हा समृद्धी व चैतन्याचा रंग आहे. भारतीय परंपरेत वनस्पतींचे अन्न सोडून इतरसुद्धा अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचे वनस्पतींबद्दल कमी-जास्त आकर्षण हे असतेच. अगदी चाळीत राहणारी गृहिणी डब्यात, बादलीत, तुळसही लावतेच.
माणूस हा पंचेंद्रियातून उपभोग घेतो. डोळे, नाक, कान, जीभ, स्पर्श किंवा त्वचा यामधून तो हे उपभोग घेत असतो. वनस्पतींच्या माध्यमातून हा उपभोग आपल्याला मिळतो. उदा. सुगंधी फुलांच्या वनस्पतींपासून नाकाला उपभोग मिळतो. या वेगवेगळ्या सुगंधामुळे शरीरात वेगवेगळ्या ग्रंथी उत्तेजित होतात. या सुगंधात मादक, प्रसन्न करणारा असा वेगळा घटक असतो. आज आपण पर्यायी औषध योजनेत (अल्टरनेट मेडिसीन) अरोमा थेरपी वापरतो. या वेगवेगळ्या वासाने वेगवेगळे वातावरण तयार होते. शरीरात निर्माण होणारे रोग किंवा दोष यामुळे जाऊ शकतात. केवडा व चमेलीच्या सुगंधाने शरीरात उष्णता निर्माण होते. तसेच वाळा व गुलाबाने थंडावा निर्माण होतो. चाफा, प्राजक्त, मोगरा प्रसन्नता येते तर बकुळ, सुरंगी यांच्या सुगंधाने मादकता येते. शक्यतो आपण ताज्या फुलांचा वापर करतो. महिला त्या केसात माळतात तर पुरुष त्यांचे अत्तर लावून सुगंधाचा अनुभव घेतात.
सुगंधाचा वापर करून किड नियंत्रण करता येते. पूर्वी रेशमी कपडे सणासुदीच्या दिवशी वापरत. इतरवेळी हे कपडे पेटीत, गाठोडय़ात, कपाटात ठेवले जात. या साठवणीत त्यांना कुबट वास येतो. तसेच त्यांना कसरसुद्धा लागण्याची शक्यता असते. आता आपण डांबराच्या गोळ्यांचा वापर करतो. त्याचा वास काही चांगला नसतो. पूर्वी या साठवणींच्या कपडय़ामध्ये बकुळीची फुले ठेवण्याची पद्धत आहे. त्यातून कपडय़ांनासुद्धा सुगंध येतो. याचप्रमाणे मुचकुंद नावाच्या वनस्पतीची फुलेसुद्धा वापरली जात. या फुलांनी सुगंध तर येतो. पण त्याचबरोबर रेशमी कपडय़ांना लागणारी कसरसुद्धा लागत नाही.
वनस्पतींचा उपभोग आपण स्पर्शाने पण घेत असतो. त्यांच्या पानांचा, फुलांचा स्पर्श हा वेगवेगळा असतो. जशी जुईची फुले तोडताना फुलांचा व पानांचा नाजूक स्पर्श असतो. प्राजक्ताच्या पानांचा स्पर्श खरखरीत असतो तर गुलाबाचे काटे टोचण्याची भीती असते.
वृक्षांच्या अस्तित्वामुळे त्याभोवती अनेक प्रकारचे किटक येत असतात. त्यांना खाण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे छोटे-मोठे रंगीबेरंगी पक्षी तेथे येतात. त्यांच्या किलबिलाटाने एक आवाजातला गोडवा कानांना सुखद वाटत असतो. तसेच फुलांवर वेगवेगळी फुलपाखरे येतात, फुलांची व फुलपाखरांचे रंग डोळ्यांना सुखावतात.
सर्वच विचारवंत, संत, महंत यांना वृक्षाखाली अनुभूती झाली, ज्ञान प्राप्त झाले. यात वड, पिंपळ, आंबा इ. वृक्ष प्रामुख्याने आहेत. त्यांच्या सावलीत बसून त्यांना स्पर्श करून आपण आपले शारीरिक व मानसिक आजार व विकार घालवू शकतो. याची दोन उदाहरणे पाहू. भीष्मराज बाम सर्वाना ठाऊक आहेतच. त्यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हणतात. ते एकदा वनवासी तरुणांच्या क्रिडा स्पर्धेत गेले होते. स्पर्धा संपल्यावर हे सर्व क्रिडापटू तेथे असलेल्या वृक्षांना मिठी मारून नंतर परत जात होते. त्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले गेले की, स्पर्धेमध्ये त्या व्यक्तीच्या मनात इर्षां, द्वेश, राग निर्माण होतो. हा स्पर्धेनंतर तसाच राहिला तर त्यांचा व्यक्तीविकास चांगला होत नाही. वनस्पतींना मिठी मारल्यानंतर वनस्पती हे विकार घेतात व त्या व्यक्ती विकाररहित होतात. या छोटय़ा गोष्टीमधून वनस्पतीच्या स्पर्शाने मनात बदल करण्याची क्षमता लक्षात येते.
दुसरे उदाहरण माझ्या भावाचेच. वयाच्या ४५व्या वर्षी त्याच्या ईसीजी रिपोर्टमध्ये हृदयाची समस्या दिसून आली. अ‍ॅलोपॅथी चिकित्सेनंतर कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गरज निर्माण झाली. तो अंबरनाथच्या वैद्य दातारशास्त्रींकडे गेला होता. त्यांनी त्याला रोज पाच चमचे तूप (साजूक) व जवसाची भाकरी असा आहार घेण्यास सांगितला. त्याचबरोबर रोज वडय़ाच्या झाडाखाली किमान पाऊणतास बसण्याचा सल्ला दिला. पहाटे वडाखाली बसून तो पुस्तक वाचत बसायचा. या पद्धतीने सहा महिने उपचार झाल्यानंतर केलेला ‘ईसीजी रिपोर्ट’ नॉर्मल आला. म्हणजे ठराविक आहार व वडाच्या अस्तित्वाने त्याचे आरोग्य सुधारले. म्हणजे अस्तित्वसुद्धा वातावरणात अनेक सुधारणा करत असते. गृहिणी तुळशीला फेऱ्या मारून काही काळ का होईना ओझोन घेत असते. आपण अगदी साधे काढे, सर्दी, खोकला, ताप इ.साठी घरी करत असतोच.
निदान दररोज चहात गवतीचहा किंवा आले यांचा वापर करून चहा तर चांगला करतोच. पण त्याचबरोबर आरोग्यसुद्धा सुधारत असतो. पूर्वजांनी या वनस्पतीच्या वापराने अनेक व्याधी घालविण्याच्या पद्धती आयुर्वेदाच्या माध्यमातून विकसित केली आहे. या सर्व वनस्पतींनी मानवी जीवन समृद्ध केले आहे. वनस्पतींचे ऋण फेडणे आवश्यक आहे. जाणीवपूर्वक त्यांची लागवड व जोपासना करणे गरजेचे आहे. जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे.

* सुगंधी वनस्पतींमध्ये झुडूप, मध्यम व मोठे वृक्ष, वेली, पाने, मुळे असे अनेक पातळीवर सुगंध निर्माण करणारे भाग असतात.
* भौगोलिक परिस्थिती, पावसाचे प्रमाण, उपलब्ध जागा यांचा विचार करून आपण या वनस्पती आपल्या घरात, गॅलरीत, आवारात नक्कीच लावू शकतो. यात वेली जाई, जुई, मोगरा, चमेली, कमळ, मधुमालती, कुसुर, रानजाई, कुंद, सायली इ. येऊ शकतात.
* झुडूप प्रकारामध्ये तुळशीचे प्रकार कृष्णतुळस, कापूर, सब्जा इ. अल्पेनिया, वेखंड, सोनटक्का, गुलाब, गवतीचहा, केवडा इ. मोठय़ा झुडूप प्रकारात- कुंती, प्राजक्त, अनंत, देवचाफा, हजारी मोगरा, सोनचाफा प्रकार, कवठीचाफा.
* वृक्षामध्ये बकुळ, सुरंगी, बूच, कदंब इ. प्रकारचे अशी बरीच मोठी यादी करता येईल व यापैकी अनेक झाडे आपण घरात व परिसरात लावून वातावरण प्रसन्न करू शकते.
* तुळस व सब्जाचे बी आपण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात घेत असतोच. तसेच गुलकंद वाळ्याचे सरबत याचा वापर थंडाईमध्ये करून उष्णतेने निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधी टाळत असतो. तसेच थंडीत आले, सुंठ, लवंग, मिरी यांचा वापर करतो. अनेक वनस्पतींच्या अस्तित्वाने वातावरण फार चांगले होते.  
राजू भट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:16 am

Web Title: health support from trees
Next Stories
1 ठाणे तिथे.. : खरंच ‘लय भारी’
2 कॉलेजच्या कट्टय़ावर : डॉक्टर, अभिनेता ते नेता..
3 सहजसफर : ..छान किती दिसते!
Just Now!
X