|| सागर नरेकर

नवी बांधकामे, नाल्याचे बदललेले प्रवाह कारणीभूत

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने शनिवारी धोक्याची पातळी ओलांडून बदलापूरसह कल्याणमधील ग्रामीण पट्टा जलमय केल्याने येथील रहिवाशांच्या मनात २६ जुलै २००५च्या प्रलयंकारी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या. नव्याने वाढलेली बांधकामे, नाल्याचे बदललेले प्रवाह कारणीभूत असल्याचे दिसत आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातून वाहणाऱ्या या नदीची पूररेषा अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात घरांचे स्वप्न दाखवत अनेक बिल्डरांनी या नदीच्या काठापर्यंत मोठमोठी संकुले उभी केली आहेत. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या तुलनेत कमी पाऊस होऊनही बदलापुरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

बदलापूर शहर आणि कल्याण ग्रामीण परिसरांतील रहिवाशांचा शुक्रवार आणि शनिवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा थरकाप उडाला. २००५ मध्ये बदलापुरातील सखल भागांसह जेथे पाणी साचले होते ते भागही यावर्षी पाण्याखाली गेले आहेत. शिवाय वरप, कांबा हे उल्हासनगर शेजारचे पण नव्याने विकसित होणारे सर्व परिसर यंदा जलमय झाले.

गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथ, कर्जत आणि मुरबाड तालुक्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने आपली धोक्याची पातळी शुक्रवारी रात्रीच ओलांडली होती. अंबरनाथ तालुक्यात गेल्या २४ तासात २८० मिलीमीटर पाऊस झाला तर मुरबाड तालुक्यात झालेल्या तब्बल ३३२ मिलीमीटर पावसामुळे उल्हास नदीला पूर आला. २६ जुलै २००५ राजी नदीने २६ मीटर पातळी गाठली होती. तर शुक्रवारी सकाळी नदीने २१ मीटर पातळी गाठली. मात्र तरीही शहरातील सखल भागात शुक्रवारी रात्रीपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली. सकाळपर्यंत बदलापूर पश्चिमेतील नदीकिनारी असलेल्या रमेशवाडी, हेंद्रेपाडा, गौरी हॉल परिसर, वालीवली एरंजाड या भागात पाणी साचले. तर शहरातील मुख्य नाल्याच्या शेजारी असलेल्या सवरेदय नगर, शनिनगर, भारत कॉलेज परिसरात इमारती आणि बैठय़ा घरांत दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या वरप, कांबा आणि म्हारळ या नव्याने विकसित होणाऱ्या गावांनाही पुराचा फटका बसला.

नागरीकरणाची परिणती

उल्हासनगरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या म्हारळ, वरप आणि कांबा गावातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या काही वर्षांत येथे झालेल्या गृहप्रकल्पांमुळे पाणी साचण्याची जागा व्यापली गेली आहे. त्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नाल्यांचे प्रवाह बदलल्याने बैठय़ा चाळींत पाणी शिरले. नागरीकरणामुळे उल्हास नदीच्या प्रवाहांवर परिणाम झाला असून काही ठिकाणी नाल्यांचे मार्गही बदलले गेले आहेत. या सगळ्यांचा एकत्रित फटका आता बसू लागला आहे.