महापालिकेकडे तक्रार करूनही दखल नाही

मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून नागरिकांना सध्या भल्यामोठय़ा रकमांची पाणी देयके पाठवण्यात येत आहेत. देयकांमध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

महापालिकेकडून दर चार महिन्यांनी पाण्याची देयके पाठवण्यात येत असतात. नळजोडणीला बसविण्यात आलेल्या मीटरची नोंद घेऊन त्याप्रमाणे देयके तयार केली जातात आणि जी मीटर बंद अवस्थेत आहेत, त्यासाठी प्रशासनाकडून सरासरी देयके पाठवली जात असतात. मात्र मीटर चालू अवस्थेत असतानाही सध्या मूळ रकमेच्या कित्येक पटीने जास्त रकमेची देयके पाठवण्यात येऊ लागली आहेत. देयकांची भरमसाट रक्कम येत असल्याच्या महापालिकेकडे लेखी तक्रारी करूनही त्याची दखलच घेतली जात नसल्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. देयक भरले नाही तर नळजोडणी खंडित करण्याची भीती असल्याने नागरिक नाइलाजास्तव देयके भरत आहेत.

भाईंदर पश्चिम येथील इंदिरा बाजारात सुमारे दीडशे फुटांचे दुकान असलेल्या जया सालियन यांना महापालिकेकडून अर्धा इंच व्यासाची नळजोडणी देण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना चार   महिन्यांसाठी आठशे रुपयांच्या आसपास देयक येत असे. त्याचा नियमित भरणा करण्यात आलेला आहे, परंतु यंदा मात्र कहरच झाला. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांसाठी सालियन यांना तब्बल ६ हजार ३०० रुपयांचे देयक पाठवण्यात आले. एवढय़ा भरमसाट रकमेचे देयक आल्यानंतर सालियन यांनी पाणीपुरवठा विभागाकडे चौकशी केली. त्या वेळी हे देयक भरा. पुढच्या वेळी नेहमीप्रमाणे देयक येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे हे देयक सालियन यांनी निमूटपणे भरले. मात्र त्यानंतर आलेले देयक पाहून त्यांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. कोणतीही थकबाकी नसताना सालियन यांना ९ हजार ७७० रुपयांचे देयक पाठवण्यात आले आहे.

पाण्याच्या देयकात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सालियन यांनी आपल्या मीटरची नियमितपणे नोंद ठेवली आहे. मात्र महापालिकेने पाठवलेल्या देयकात त्यांच्या मीटरवरील नोंद आणि सालियन यांनी ठेवलेल्या नोंदीत प्रचंड तफावत असल्याचे दिसून येत आहे. मुळात मीटरचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी गेल्या कित्येक महिन्यांत जागेवर फिरकलेलेच नाहीत, असा आरोप सालियन यांनी केला आहे. या प्रकरणी सालीयन यांनी पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही असे सालीयन यांचे म्हणणे आहे. इंदिरा बाजारातील अन्य दुकानदारांनाही अशाच पद्धतीने भरमसाट पाणी देयक आल्याने तेही त्रस्त आहेत.

रहिवासी आणि व्यावसायिक नळजोडणीच्या दरात पाचपटीचा फरक आहे. कित्येक व्यावसायिक आस्थापनांना रहिवासी दराने पाणीपुरवठा होत होता. हे बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिक नळजोडणीला किती देयक द्यायला हवे याचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानुसार आता सुधारित देयके पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे केवळ व्यावसायिक देयकांमध्ये वाढ झाली आहे. मीटर रीडिंगमध्ये दिसत असलेली तफावतही मीटरमधील दोषामुळे आहे. सध्या योग्य पद्धतीने देयके पाठवली जात असून त्यात कोणताही गोंधळ नाही.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग