चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिल्याने कारवाई

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने करोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने वागळे इस्टेटमधील हनुमाननगर परिसरात करोनाचे संकट गडद झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी रुग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हनुमाननगरमधील एका ५० वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ३० एप्रिल रोजी त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या रुग्णाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेत अनेकजण सामील झाल्याचे बोलले जात असून यामुळे डोंगर टेकडीवर वसलेल्या दाटीवाटीच्या भागात करोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र आहे.

महिला डॉक्टरला लागण

कळवा रुग्णालयातील एका परिचारिकेला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्याचे समोर आले असतानाच त्यापाठोपाठ आता एका ५५ वर्षीय महिला डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरच्या दोन मुलींची तसेच तिच्या संपर्कात आलेल्या ३ ते ४ डॉक्टरांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.