स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिकेची नोटीस

ठाणे : पोखरण येथे महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने बेकायदा इमारत उभी करण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी तक्रारींच्या माध्यमातून दबाव वाढवल्यानंतर पालिकेकडून संबंधित बांधकामधारकास नोटीस बजावण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये मैदानांची जागा आरक्षित करण्यात आली होती. या जागांवर अतिक्रमण झाले असून यामुळे शहराच्या विविध प्रभागांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पोखरण दोन परिसरामध्ये गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. याच भागातून सिद्धांचल परिसराच्या दिशेने जाणाऱ्या नवीन रस्त्यालगत दोन मजल्याचे मोठे बांधकाम करण्यात आले आहे. महापालिकेचा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. बांधकाम केलेल्या ठिकाणी हॉटेल, पानटपरी तसेच इतर कार्यालये सुरू करण्यात आली असून एका हॉटेल व्यावसायिकाने हे बांधकाम केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या संदर्भात महापालिका मुख्यालय आणि वर्तकनगर प्रभाग समितीकडे तक्रारी करण्यात आल्या असून त्यावर मात्र कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान, यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, विधानसभा निवडणुकीच्या काळात हे बांधकाम करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची पाहणी केली. मात्र, त्या जागेवर आरक्षणाचा फलक नव्हता.  त्यामुळे हा भूखंड कुणाचा हे समजत नसल्याने या जागेबाबत शहर विकास विभागाकडून माहिती घेण्यात आली. त्यामध्ये ही जागा महापालिकेच्या मैदानासाठी आरक्षित असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित बांधकामधारकाला अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे,’ असे वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त चारुशीला पंडित यांनी सांगितले.