नालासोपाऱ्यातून हल्लेखोराला अटक; हल्ल्यात सूनही जखमी
घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. गुरुवारी रात्री नालासोपारा येथे ही घटना घडली. हल्लेखोर व्यक्तीने पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेवरही हल्ला केला. त्यात ती जखमी झाली.
राजेंद्र सावंत (४८) हे नालासोपारा पूर्वेच्या संखेश्वर नगरातील साईगणेश दर्शन सोसायटी चाळीत पत्नी रंजना सावंत (४४) आणि दोन मुलांसमवेत राहतात. सावंत आणि त्यांचा विवाहित मुलगा किरण मुंबईत चालक म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री राजेंद्र सावंत आणि दोन्ही मुले कामाला गेले होते, तर सून अनिक्षा मुलांसमवेत घरी होती. राजेंद्र सावंत घरी परत आले तेव्हा त्यांची पत्नी रंजना बाहेर गेली होती. सावंत यांनी सुनेला पाठवून तिला घरी बोलावले. रात्री १० च्या सुमारास सावंत आणि त्यांची पत्नी रंजना यांच्यात भांडण झाले. त्या भांडणाचा राग येऊन सावंत यांनी स्वयंपाकघरातील चाकू आणून रंजना यांच्यावर वार केले. त्यांच्या मदतीला सून अनिक्षा गेली तर तिच्यावरही हल्ला केला. आरडाओरड झाल्यानंतर इमारतीमधील लोक मदतीला धावून आले. जखमी रंजना आणि सून अनिक्षाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रंजना यांना मृत घोषित केले.

सावंत यांचा त्यांच्या पत्नीशी गेल्या काही वर्षांपासून वाद होता. दोघे एकमेकांवर चारित्र्याचा संशय घेत होते. त्यावरून त्यांच्यात भांडणे होत होती. सावंत यांना घटस्फोट हवा होता, पण घर नावावर केल्याशिवाय घटस्फोट देणार नाही, असे रंजनाने सांगितले होते. सावंत घरात राहत असले तरी ते जेवण बाहेर करत होते. या मुद्दय़ावरून त्यांच्यात सतत भांडणे व्हायची.
– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज