पुंडलिक म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेसोबत युती झाली नाही तर किमान जागा तरी आपल्या हाती याव्यात म्हणून शिवसेना, मनसे पक्षातील मातबर नेत्यांना फोडण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेनेतील मातबरांना फोडण्यासाठी भाजपकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्यावरही तसा दबाव आहे. मात्र शिवसेना सोडणार नाही, असे स्पष्टीकरण कल्याणातील शिवसेना नेते पुंडलिक म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले. ‘माझा मुलगा दीपेश माझ्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे तो अशी चूक करेल असे वाटत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी डोंबिवलीत भाजपच्या विकास परिषदेसाठी येत आहेत. या वेळी शिवसेना, मनसे पक्षातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कपिल पाटील यांनी शिवसेना तसेच मनसेच्या मातबरांना भाजपत प्रवेश करण्यासाठी गळ घातली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, नगरसेविका पत्नी रत्नप्रभा व नगरसेवक मुलगा दीपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे चार व मनसेचे दोन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. म्हात्रे यांना आपल्या समर्थकांसाठी काही हक्काच्या जागा शिवसेनेकडून हव्या आहेत. मात्र त्या देण्यास शिवसेनानेते तयार नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, यासंबंधी वृत्ताचे खंडन करताना आपण शिवसेनेतच राहणार, असे स्पष्टीकरण त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले.