25 February 2021

News Flash

कांदळवनांना बांधकामांचे ग्रहण

कांदळवनाच्या जागीच कचऱ्याची विल्हेवाट

तारापूर येथील खाडी भागात असलेल्या कांदळवनात भराव टाकून बांधकामे करण्यात येत आहेत.

तारापुरात बेकायदा बांधकामांसाठी खारफुटींची कत्तल; कांदळवनाच्या जागीच कचऱ्याची विल्हेवाट

तारापूर येथील सागरी महामार्गालगत असलेल्या खारफुटी भागाला बेकायदा बांधकामे आणि भरावाचे ग्रहण लागल्याने कांदळवनाचे क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परवानगी न घेता बेसुमार बांधकामे येथे होत आहेत. कांदळवन क्षेत्र अबाधित राहावे यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसून पालघरच्या महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तारापूर-चिंचणी बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या खारफुटीच्या जागेवर भराव टाकून बांधकामे केली जात आहेत. कांदळवनाची कत्तल केलेल्या भूमाफियांवर कोणत्याही प्रकाची कारवाई केली जात नाही. पारसी आळी येथील कांदळवन असलेल्या जमिनीवर विकासकाने कोणतीही प्रकारची परवानगी न घेताच बांधकामाला सुरुवात केली. या बांधकामांवर तारापूरच्या तलाठय़ांनी दोन वेळा कारववाई करून त्याचा अहवाल सादर केला होता. मात्र तरीही या ठिकाणी कांदळवनात भराव टाकला असल्याचे दिसत आहे. भराव टाकून केलेल्या बांधकामांमुळे कांदळवनांचा नाश होत आहे. याबाबत कोणतीही पाहणी आणि कारवाई करण्यात आली नसल्याने कांदळवनाचा हा पट्टाच नष्ट होणार असल्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

त्याशिवाय तारापूर आणि चिंचणी ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा खाडी भागात टाकून पेटवला जात असून त्यामुळे खाडी परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. कचरा पेटवला जात असल्याने कांदळवन क्षेत्र धोक्यात आले आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आरएमसी मिक्सरमधील काँक्रिट टाकले जात असल्याचेही दिसून आले आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या खाडी क्षेत्रातील कांदळवनाची कत्तल खुलेआम सुरू असतानाही याकडे महसूल व वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

कायद्याची अंमलबजावणी नाही

कांदळवनाबाबत कायदा कठोर केल्याने कांदळवन नष्ट केल्याबाबत तक्रार दाखल केल्यास गुन्हेगारांना अजामीनपत्र अटक आणि पाच वष्रे सक्तमजुरी आणि लाखो दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कांदळवनाची तोड यापूर्वी झाली असता फक्त वन विभागच तक्रार घेऊ  शकत होते किंवा पोलीस विभाग फक्त वृक्षतोड केल्याचा गुन्हा दाखल करून घेत होते. कायद्यातील बदलामुळे आता पोलीसही कांदळवन कत्तल केल्याबाबत गुन्हा दाखल करू शकते. परंतु  एकही गुन्हा या भागात दाखल झाला नसल्याने कांदळवनाची तोड करणाऱ्यांना मोकळीक मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन परिसरात ५० मीटरचा बफर झोन सोडणे बंधनकारक असतानाही या भागात बांधकामे केली जात आहेत.

तारापूर येथे असलेल्या खाडीक्षेत्रातील कांदळवनाचा अहवाल तहसीलदारांकडून त्वरित मागवण्यात येईल. कांदळवनाची तोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.   – विकास गजरे, प्रांत अधिकारी, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:15 am

Web Title: illegal construction in boisar
Next Stories
1 ठाण्यात आयपीएल सराव?
2 बदलापुरातही ‘मेट्रो’ संघर्ष
3 पालघरमध्ये घरात शिरला बिबट्या
Just Now!
X