मानपाडा रोडवरून इंदिरा चौकात हलविण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय, मात्र परिसरात कोंडी
प्रवाशांच्या सोयीचे कारण पुढे करीत शहरात अनेक ठिकाणी निर्माण होत असलेल्या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. स्थानक परिसरात जागोजागी असलेले असे रिक्षा थांबे फेरीवाल्यांप्रमाणेच सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. मानपाडा रोडवर सुरू असलेले रस्त्याचे काम, फेरीवाल्यांची गर्दी यामुळे प्रवासी संतापलेले असतानाच आता या रस्त्यांच्या कामासाठी चक्क अनधिकृत रिक्षा थांब्यांची जागाही बदलल्याने इंदिरा चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादानेच ही कोंडी होत असून आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
एकीकडे कल्याण येथील वाहतूक शाखेने गेल्या महिन्यात मुजोर रिक्षाचालकांसह बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु डोंबिवलीतील रिक्षाचालकांना मात्र वाहतूक पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचे दिसून येते. डोंबिवली शहराच्या पूर्वेला मानपाडा रस्त्याच्या सीमेंट क्राँक्रीटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे इंदिरा चौकासमोरील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोरील रिक्षा व टॅक्सी थांबा हलविण्यात आला आहे. वाहतूक शाखेसोबत झालेल्या चर्चेनुसार हे थांबे अमुक ठिकाणी हलविण्यात आल्याचे चक्क फलक रस्त्यांवर लागले आहेत. यावरून या रिक्षा थांब्यांना वाहतूक पोलिसांचेच अभय असल्याचे स्पष्ट होत आहे.
इंदिरा चौकातील टॅक्सी थांबा हा पनवेल बस थांब्याच्या पुढे तर रिक्षा थांबा हा महापालिका वाचनालयासमोरील रस्त्यावर हलविण्यात आला आहे. या रिक्षा व टॅक्सी थांब्यामुळे सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस स्थानकातून सुटल्यानंतर इंदिरा चौकातील वळणावर उभ्या असलेल्या रिक्षांमुळे या बसेसला वळण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच महापालिकेच्या समोरच रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा थांबे आहेत, तसेच या वळणावर एक दुभाजकही आहे. परंतु तो वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा येथील दुभाजकावर वाहने आदळून सौम्य अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. पनवेल-वाशी बस स्थानकाजवळ प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. येथेच निवासी भागात जाणाऱ्या रिक्षांचाही थांबा आहे. त्यातच आता सहा आसनी व्यवस्था असलेल्या टॅक्सी थांबा हलविण्यात आला आहे. मानपाडा रस्त्यावर सध्या एकेरी वाहतूक सुरूअसून सकाळ व संध्याकाळ येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

रिक्षावाल्यांसमोर पोलीस हतबल?
हे थांबे इथेच हलविण्यापेक्षा इतरत्र हलविता येऊ शकले असते, परंतु रिक्षा चालकांसमोर वाहतूक पोलिसांचेही काही चालत नाही. त्यांना येथेच धंदा जास्त होत असल्याने त्यांनी वाहनतळ येथून दुसरीकडे हलविण्यास नकार दिला. प्रवाशांवर मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकांपुढे वाहतूक पोलिसांचीही कशी मात्रा चालत नाही, याचे हे उत्तम उदाहरण आहे. वाहनचालकाचे अनवधानाने कधी वाहनावरील नियंत्रण सुटले तर मोठा अपघात गर्दीच्या वेळी येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती प्रवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.