पावसाळ्यामध्ये वादळ, पूर, जमीन खचणे, झाडे पडणे अशा अपघातांची शक्यता मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने या काळात विम्याची सर्वाधिक गरज भासते. वाहन विम्याच्या माध्यमातून कार सुरक्षित करता येत असून होणारे नुकसान विमा कंपनीकडून मिळते. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरामध्ये अशा प्रकारच्या विमा दाव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. झाडे पडण्यामुळे गाडीचे सर्वाधिक नुकसान होत असते. अपघात झाल्यानंतर २४ तासांमध्ये विमा कंपनीकडे विम्यासाठी दावा दाखल करून या अपघाताची माहिती देणे गरजेचे असते. त्यानंतर गाडीची पाहणी करून त्याच्या दुरुस्तीची आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे वाहनाच्या सुरक्षेसाठी विमा हा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
वाहन खरेदी केल्यानंतर गाडीचा विमा काढण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाते. गाडी खरेदी करत असलेल्या शो-रूम, ऑनलाइन पद्धतीने आणि विमा एजन्टच्या मदतीने विमा काढला जात असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाते. सध्या ऑनलाइन पद्धतीने विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली असून यामुळे कागदपत्रविरहित प्रक्रिया करणे सोपे जाते. वाहनांवर झाडे पडण्यामुळे होणारे नुकसान हे नैसर्गिक अपघातामध्ये मोडते. याबरोबरच या विभागामध्ये आग, स्फोट, आकाशातील वीज पडणे, भूकंप, पूर, प्रचंड चक्रीवादळ, जमीन खचणे, गारपीट, दगड कोसळणे अशा अपघातांचा समावेश यामध्ये होत असतो. अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर त्यात होणारी नुकसानभरपाई विमा सुरक्षेतून मिळू शकते. वाहन विम्यामध्ये याशिवाय अन्य मानवनिर्मिती अपघातांच्या कारणासाठीही विमा सुरक्षा मिळत असते. वाहनाचे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास अपघाताची माहिती तात्काळ विमा कंपनीला लेखी स्वरूपात करणे आवश्यक असते. कार पार्किंगमध्ये उभी असल्यास कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर करून विमा नुकसानभरपाईसाठी दावा करता येतो, अशी माहिती कल्याणमधील विमा सल्लागार सुयश केळकर यांनी दिली.

झाडे पडल्यामुळे होणारे अपघात अधिक..
ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये झाडांची स्थिती अत्यंत गंभीर असून नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये पावसाळ्यात झाड पडून होणारे नुकसान अधिक असते. झाडे पडणे, फांद्या कोसळणे, झाडावरून नारळ कारवर पडणे या कारणामुळे कारचे नुकसान होत असून अशा प्रकारच्या अपघातातही कंपनीकडे विमा दावा केला जातो. प्रत्येक अपघातामुळे होणाऱ्या नुकसानीची परिपूर्ण माहिती कागदपत्रांच्या आधारे कंपनीकडे दिल्यास वाहनाचा विमा व्यवस्थित मिळू शकतो. – सुयश केळकर, विमा सल्लागार