प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संतापलेल्या २६ वर्षीय युवकाने महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी वसईतील फॅक्टरीमध्ये ही घटना घडली. आरोपी आणि महिला दोघेही एकत्र काम करतात. जखमी महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. पोलिसांनी विकास यादव विरोधात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) या कलमातंर्गत गुन्हा नोंदवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

विकास त्याच्यासोबत फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विकास अविवाहित असून त्याने संबंधित महिलेला त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्याची गळ घातली होती. पण महिलेने त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला.

तो फोनवरुनही त्या महिलेला त्रास देत होता. तिने याबद्दल तिच्या नवऱ्याकडेही तक्रार केली होती. मंगळवारी सकाळी विकास यादव कामावर पोहोचला नव्हता. काही वेळाने तो कामावर आला. त्यावेळी त्याच्याकडे चाकू होता. तो थेट महिलेच्या दिशेने गेला व तिचा गळा चिरला. महिला जमिनीवर कोसळल्यानंतर त्याने स्वत:वर वार करुन संपवण्याचा प्रयत्न केला. पण फॅक्टरीमध्ये असलेल्या इतर लोकांनी त्याला रोखले. विकास यादव किरकोळ जखमी झाला आहे. महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. पोलीस या महिलेची जबानी नोंदवून घेण्यासाठी वाट पाहत आहेत.