|| ऋषिकेश मुळे

 

६ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, वाढ खुंटली  :- हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे शेतातच कुजली. या नुकसानीतून शेतकरी उभा राहत रब्बी हंगामासाठी झटत असताना त्यावरहीढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे ‘ग्रहण’ दिसत आहे. काही दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाखाली सुमारे सहा हजार हेक्टर असलेले क्षेत्र धोक्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी पालक, भेंडी, शिमला मिरची, वांगे, टोमॅटो या भाज्यांसह हरभरा आणि भुईमुगाचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असमतोल वातावरणामुळे या पिकांवर रोग पडू लागल्याने रोगनाशक फवारणीचा अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षकांकडून विशेष मागदर्शन शाळेचेही तालुकस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे.

आंब्यालाही मोहर लागायला सुरुवात झाली असतानाच या ढगाळ वातावरणाचा फटका त्याला बसत आहे. मोहर गळून जात असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. ही परिस्थिती अशीच काही दिवस राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शहापूर तालुका कृषी मंचाचे अध्यक्ष नंदू मोगरे यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच उर्वरित रब्बी पिकांची लागवड करावी असे आवाहन कृषी साहाय्यक अधिकारी योगेश सोळंकी यांनी केले आहे.आठ दिवस कायम वातवारण ढगाळ असल्याने रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतात लाावलेल्या भाजीपाल्याच्या रोपांची वाढ खुटत आहे. रोपेही कोमेजून गेल्याचे शहापूर तालुक्यातील शेतकरी शिवराम भोये यांनी सांगितले.

शेतकऱ्यांवर आर्थिक ताण

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच त्यांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर कीड हटवण्यासाठी औषध फवारणी करावी लागणार आहे. याचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. कीटकनाशक फवारणी करूनही पुढील काळात पुन्हा ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झाल्यास आणि तुरळक पाऊस पडल्यास रब्बी पीकही हातचे जाईल की काय याची भीती शेतकऱ्यांना आहे.

कार्यशाळा

हरभऱ्याचे पीक अधिक प्रमाणात घेण्यात  येत आल्यामुळे विशेष हरभरा शेती कार्यशाळा राबवण्यात येणार आहे. तज्ज्ञांकडून रोगाचा नाश करून उत्तम पीक घेण्याविषयीचे मागदर्शनही करण्यात येणार असल्याचे  ठाणे जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने यांनी सांगितले.