डोंबिवली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरी क्लब डोंबिवलीचे संस्थापक, उद्योजक मनोहर रामकृष्ण पाटील यांचे शनिवार निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. आश्रय क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांचे ते बंधू होत.

मुंबईतील व्हीजेटीआयमधून बी. ई.चे(इलेक्ट्रिकल) शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोहर पाटील यांनी डोंबिवली एमआयडीसीत कंपनी सुरू केली होती. स्थानिकांना रोजगार देऊन अनेक कुटुंब त्यांनी उभी केली. लेवा प्रागतिक मंडळाचे ते १७ वर्ष अध्यक्ष होते. रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. युवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. आश्रय क्लबचे ते आधारस्तंभ होते. आदिवासी वाडय़ा-पाडय़ांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्येष्ठ नागरिक संघ, निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कामात त्यांचा सहभाग होता. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या रकमा मिळून देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती.