अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र योग्य काम करत नसल्याचा ठपका ठेवत ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने नवीन उद्योगाला व उद्योग विस्ताराला परवानगी न देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. येथील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अंबरनाथ औद्योगिक क्षेत्राला १५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. त्यामुळे येथील उद्योगांचे कंबरडे मोडण्याची चिन्हे दिसत आहेत.
अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली भागातील औद्योगिक क्षेत्रात नव्या उद्योगाला व विस्ताराला राष्ट्रीय हरित लवादाने परवानगी नाकारली असून सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र योग्य रीतीने कार्यरत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने होत असून त्यामुळे प्रदूषणात भर पडत असल्याचा ठपकादेखील या औद्योगिक क्षेत्रांवर ठेवण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु या औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची तपासणी दर पंधरा दिवसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वत: करत असते. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने ही कार्यवाही करण्याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत का निर्णय घेतला नाही, असा प्रश्न अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थित केला आहे.
येथील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापन हे अंबरनाथ औद्योगिक क्षेत्राने खाजगी ठेकेदाराला दिले असून हा ठेकेदारच या कामात कुचराई करत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत अंबरनाथ औद्योगिक क्षेत्राचे अभियंता भालचंद्र केंद्रे यांना विचारले असता, त्यांनी ते रजेवर असल्याचे सांगून रुजू होताच या मुद्दय़ावर बोलू असे सांगितले.

हा निर्णय अनाकलनीय असून या निर्णयाने येथील उद्योजकांना नाहक भरुदड पडणार आहे. कारण १५ कोटींची रक्कम ही येथील उद्योजकांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे येथील उद्योजकांना कारखाने बंद करून जाण्याची पाळी येईल. यामुळे येथील १ लाख कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाला पत्रव्यवहार करणार असून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.– उमेश तायडे, ‘आमा’चे अध्यक्ष
     (अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या कंपन्यांची संघटना)