किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडून मर्यादित पुरवठा; मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये लक्षणीय वाढ

ठाणे : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या करोना चाचणीच्या भीतीने अनेक किरकोळ विक्रेते बाजारसमितीत जाण्याचे टाळू लागले आहेत. परिणामी किरकोळ बाजारात फळे आणि भाज्या यांची आवक मंदावली आहे. त्या तुलनेत त्यांच्या मागणीत मात्र सातत्याने वाढ होऊ लागली असून परिणामी फळांच्या दरांत दहा ते ६० रुपयांची तर भाज्यांच्या दरांत १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चार तासात जास्त प्रमाणात मालाची विक्री शक्य नाही. तसेच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येकाची शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. त्यात नकारात्मक अहवाल येणाऱ्यांनाच समितीमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते भाजी आणि फळांची खरेदी करण्यासाठी समितीमध्ये जाणे टाळत आहेत. तसेच या समितीमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या काही किरकोळ विक्रेत्यांकडूनच भाजी आणि फळांची खरेदी करून त्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांची आवक २० टक्क्य़ांनी घटली आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिक आरोग्याची काळजी घेत असून त्यासाठी फळांचे सेवन करीत आहेत. सध्या मुस्लीमधर्मीयांचा रमजान महिनाही सुरू असून या काळात फळांची मागणी वाढली आहे. परिणामी फळांच्या दरात १० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.

भाज्यांचे दर(रुपये प्रति किलो)

भाजी               घाऊक किरकोळ

भेंडी                    ४०     ८०

गवार                  ६०    ८०

फरसबी               ४०     ८०

कोबी                 १०     ४०

फ्लॉवर                २०     ४०

वांगी                 १४     ५०

टॉमेटो                १५     ४०

शिमला मिरची          ३०     ६०

फळांचे दर (रुपये प्रति किलो)

फळे    घाऊक

किरकोळ कलिंगड        १०      ६०

खरबूज                      २०       ५०

सफरचंद                     १००    २००

पपई                          १७       ४०

संत्री                         ६०     १७०

डाळिंब                      ९०     १३०

मोसंबी                       ५७     १५०

केळी (डझन)                 २५     ५०

 

बटाटे महागले

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथून बटाटय़ांची आवक मोठय़ा प्रमाणात होत असते. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात बटाटय़ांची आवक ५० टक्क्य़ांनी घटली आहे. त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात २० रुपये किलोने विकले जाणारे बटाटे  ३० रुपये किलोने विकले जात असल्याची माहिती किरकोळ बाजारातील कांदा बटाटे विक्रेते राजेश तांबटकर यांनी दिली.