वांद्रे येथील रुग्णालयात उपचार

नवी मुंबई पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीत आलेल्या एका जखमी कोल्ह्य़ाला येथील काही सर्पमित्रांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. वेळीच त्याला पडकले अन्यथा तो कोल्हा कुत्र्यांची शिकार झाला असता. त्याच्यावर वांद्रे येथील प्राणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐरोली सेक्टर १० परिसरात तो सापडला.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्याचे खाडीकिनारी वास्तव्य होते. अधूनमधून तो दर्शन देत असे. नवी मुंबईला मोठा खाडीकिनारा असून मासे व खेकडे हे खाद्य मुबलक असल्याने कोल्ह्य़ासारखे प्राणीही या खाडीत मोठय़ा प्रमाणात आहेत. बुधवारी सर्पमित्र अमरजित गुरुंगा यांना कोल्हा आला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुरेश खरात, संजय रणपिसे आणि गणेश गुपाले या सहकाऱ्यांना बरोबर घेत त्याला पकडून त्यांनी कांदळवन विभागाकडे दिले. मात्र, त्यांच्याकडे प्राण्यांबाबत यंत्रणा नसल्याने त्यांनी हा प्रकार मुलुंड वन विभागाला कळविला. तोपर्यंत ‘रॉ’ या संस्थेचे पथकही पोहचले. प्राण्यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला मुलुंड येथे नेण्यात आले. कोल्हा आजारी असून वांद्रे येथील प्राणी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ‘रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर’चे संस्थापक अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.

तो कुत्र्यांची शिकार झाला असता

खाडीत असलेले विपुल खेकडे हेच कोल्ह्याचे मुख्य खाद्य आहे. तहान भागविण्यासाठीच तो नागरी वस्तीकडे आला असावा. या कोल्ह्याला खाडीत जायचे होते, मात्र भटकी कुत्री त्याच्यावर हल्ला करीत होती. त्यामुळे त्याला जाता येत नव्हते, असे येथील रोपवाटिकेत काम करणाऱ्या महेंद्र चौधरी यांनी सांगितले.