ठाणे, उल्हासनगर भाजपमध्ये मतभेदांचे वारे; जुने-जाणते संतापले

महापालिका निवडणुकांमध्ये युती करताना शिवसेनेपुढे पारदर्शी कारभाराची अट टाकणाऱ्या भाजप नेत्यांनी ठाणे आणि उल्हासनगरात वादग्रस्त नेत्यांना पक्ष प्रवेशासाठी लाल गालिचा अंथरण्याची तयारी सुरू केली असून यावरून पक्षात मतभेदांचे वारे वाहू लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उल्हासनगरात कलंकित नेते पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांना पक्षात घ्यावे यासाठी भाजपमधील एक मोठा गट सक्रिय झाला असून ठाण्यात सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासाठी थेट राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीच आग्रह धरल्याने पक्षातील जुन्या नेत्यांनी थेट बंडाचे हत्यार उगारल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीतही या मतभेदांचे प्रतििबब उमटल्याचे सांगितले जाते.

[jwplayer DMXAiw19]

पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले आणि आमदार संजय केळकर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गाने इतर पक्षातील नाराजांना गळाला लावण्यासाठी जाळे टाकत आहेत. गुरुवारी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त काही पक्षप्रवेश ठरले असताना बुधवारी रात्री केळकर यांनी शिवसेनेतून फुटून आलेल्या नगरसेविकेला थेट ‘वर्षां’वारी घडवली. त्यामुळे पक्षातील विसंवादाची चर्चा सुरू असतानाच ओमी आणि सुधाकर चव्हाण यांना प्रवेश देण्यावरून हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ओमी यांना पक्षात घेतल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असे या नेत्यांचे म्हणणे आहे. ठाण्यातही परमार प्रकरणातील आरोपी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना पक्षात घ्यावे यासाठी एक गट आग्रही आहे. या गटाला रवींद्र चव्हाण यांचा पाठिंबा असून केळकर यांनी मात्र ही आत्मघातकी खेळी ठरेल, असे म्हणणे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्याचे वृत्त आहे. एखाद, दुसऱ्या जागेचा विचार करून चव्हाण यांना पायघडय़ा घातल्या तर ठाण्यातील गुजराती, मारवाडी समाजाची नाहक नाराजी ओढवून घ्यावी लागेल, असे केळकर गटाचे म्हणणे आहे. यावरून चव्हाण आणि केळकर या दोन गटांमध्ये जुंपल्याचे चित्र असून त्याचे पडसाद येत्या काळात उमटण्याची चिन्हे आहेत.

जिल्हाध्यक्षांची सावध प्रतिक्रिया

ओमी कलानी यांच्या प्रवेशाबाबत उल्हासनगर भाजप जिल्हा अध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारले असता त्यांनी अशी कोणतीही चर्चा पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत झाली नसल्याचे सांगितले. तसेच प्रवेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आणि तो आम्हाला मान्य असेल अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमदार संजय केळकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मतपेटीची चिंता

नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरात भाजपचा पराभव करत ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. त्यामुळे कलानी पुत्र ओमी यांना पक्षात घेत राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती आखली जात असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि पक्षातील प्रदेश पातळीवरील काही चाणक्यांनी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या भागातील माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी तसेच ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ओमी यांच्या प्रवेशास विरोध केला आहे.

[jwplayer lfIhayz2]