औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांत अनेक खड्डे; वाहनचालकांसह कामगारांचे हाल; चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे उद्योजक हतबल

अंबरनाथ : हजारो कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, सुमारे ६० हजार कामगारांना रोजगार आणि स्थानिक नगरपालिकेच्या करात मोलाचा वाटा देणाऱ्या अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे.

त्याचा त्रास उद्योजक, वाहनचालक आणि कामगारांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.

करोनाच्या जागतिक आपत्तीत टाळेबंदीमुळे उद्योगक्षेत्राला मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागला आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कंपन्या हळूहळू सुरू होत असून कामगारही कंपन्यांकडे परतू लागले आहे. अंबरनाथ शहराच्या आनंदनगर भागात अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र आहे. राज्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून या वसाहतीची ओळख आहे.  आनंदनगर औद्योगिक वसाहतीत सुमारे ४८ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते आहेत. वसाहतीतील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गेल्या वर्षांत या वसाहतीच्या प्रवेशद्वारावरच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. १२ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले काम अजूनही पूर्ण होऊ  शकलेले नाही. तर अंतर्गत रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली आहे. वसाहतीत दररोज शेकडो मालवाहतूक करणारे ट्रक आणि टँकर येत असतात. परंतु खराब रस्त्यांमुळे मुख्य कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. तर कामगारांनाही या रस्त्यांवरून मार्ग काढताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या करोनाच्या संकटात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खासगी वाहतुकीला कामगार प्राधान्य देत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही वाढल्याचे अनेक कामगार सांगतात. या रस्त्यांमधून जाताना अनेक लहान-मोठे अपघातही होत असून त्यामुळे कामगारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अनेक नव्या उद्योजकांना या वसाहतीत येणे जिकिरीचे होत असून त्याचा गुंतवणुकीला फटका बसण्याची भीतीही अनेक उद्योजक व्यक्त करत आहेत. याबाबत महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, करोना आणि कामगारांच्या कमतरतेमुळे रस्त्यांच्या डागडुजीला उशीर झाला आहे. लवकरच सर्व रस्त्यांची डागडुजी केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता संजय पवार यांनी सांगितले आहे.

प्राथमिक सोयीसुविधांचाही अभाव

सुमारे एक हजार कारखाने, ६० हजारांहून अधिक कामगार असलेल्या या वसाहतीत वार्षिक उलाढाल १२ हजार कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक नगरपालिकेला कोटय़वधी रुपयांचा कर मिळतो. असे असले तरी रस्त्यांसह पथदिवे, वाहतूक साधने, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी प्राथमिक सुविधाही औद्योगिक वसाहतीत नाही, असे येथे सांगितले जाते.