ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांसह अन्य विभागातील ४६ पोलीस निरीक्षकांच्या मंगळवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या ३० पोलीस निरीक्षकांच्या ठाण्यासह विविध विभागात नेमणुका करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गुन्हे, वाहतूक आणि विशेष शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील बदल्या तसेच सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या सात पोलीस ठाण्यामध्ये नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची  नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झालेल्या तीन साहाय्यक पोलीस आयुक्तांची विविध विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असून या परिमंडळा अंतर्गत ३३ पोलीस ठाण्यांचा कारभार चालतो. याशिवाय, गुन्हे अन्वेषण शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा हे विभागही येतात. पोलीस ठाण्यात दोन वर्षे तर गुन्हे अन्वेषण शाखेत तीन वर्षे असा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची दरवर्षी अंतर्गत बदली करण्यात येते. त्याचनुसार ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये ४६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून त्यापैकी पाच जणांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती देऊन त्यांच्याकडे पोलीस ठाण्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये अनेक गुन्ह्य़ांची उकल करण्याची कामगिरी करणारे गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ आणि नासीर कुलकर्णी यांची अनुक्रमे कापुरबावडी आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच राज्यात नुकत्याच झालेल्या बदलीमध्ये ३० पोलीस निरीक्षक ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. या निरीक्षकांच्याही पोलीस ठाण्यासह विविध विभागात नेमणुका करण्यात आल्या आहेत. तसेच त्यापैकी पाच जणांकडे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

साहाय्यक आयुक्तांच्या नेमणुका

राज्यातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये बाजीराव भोसले, सैफन मुजावर आणि रवींद्र वाडेकर यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात नेमणूक करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांची विविध विभागात नेमणूक करण्यात आली आहे. बाजीराव भोसले यांच्याकडे वागळे विभाग, सैफन मुजावर यांच्याकडे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रवींद्र वाडेकर यांच्याकडे मुख्यालय-१ची जबाबदारी देण्यात आली आहे. यापैकी भोसले आणि वाडेकर या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.

बदल्यांमध्ये चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक

कोपरी पोलीस ठाण्याच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता काळबांडे यांची चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांची गुन्हे शाखेत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.व्ही. बाबर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

दहा अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अंतर्गत बदल्या आणि नव्याने दाखल झालेल्या अशा दहा अधिकाऱ्यांकडे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये दिलीप गोडबोले (शिवाजीनगर), संभाजी कोरडे (कोपरी), शकील शेख (उल्हासनगर), जितेंद्र आगरकर (बदलापूर पश्चिम), पी.डी. वाघ (अंबरनाथ), रवींद्र मालेकर (वागळे इस्टेट), सुरेंद्र शिरसाट (विठ्ठलवाडी), शांताराम अवसरे (मानपाडा), मंगेश सावंत (कोनगाव), मुक्तारअली बागवान (कळवा)