– भाग्यश्री प्रधान

दाखला, सवलत प्रमाणपत्रासाठी धावाधाव करण्याची वेळ; जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी लांबलचक रांगा

शरीराने अपंग असतानाही शिक्षण, नोकरीमध्ये पुढे झेपावण्याच्या निर्धाराने धडपडणाऱ्या अपंग नागरिकांचे ठाणे महापालिकेकडून मानसिक खच्चीकरण होत आहे. विविध ठिकाणी अपंगत्वाचा पुरावा म्हणून आवश्यक असलेला दाखला आणि सवलत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आठवडय़ाच्या दर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात शेकडोंच्या संख्येने अपंगांना रांग लावावी लागत असून कडक उन्हाच्या झळा अंगावर झेलत त्यांना आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यंत्रणेतील बिघाड, रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, सरकारी सुट्टी अशी विविध कारणे या दिरंगाईमध्ये असली तरी, प्रमाणपत्रासाठी रांग लावणाऱ्या अपंगांकरिता बसण्याची व्यवस्था करण्याची माणुसकीही प्रशासनाने दाखवलेली नाही.

अपंगत्वामुळे आधीच थकलेले शरीर, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लांबच्या ठिकाणाहून करावा लागणारा प्रवास, रुग्णालयात दाखल झाल्यावर असुविधांमुळे भोगाव्या लागणाऱ्या समस्या यामुळे दर बुधवारी जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात अपंग व्यक्तींच्या पदरी निराशाच पडत आहे. जिल्हा मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दर बुधवारी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येते. राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून हे प्रमाणपत्र रुग्णांना दिले जाते. गेल्या आठवडय़ात या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे प्रमाणपत्राशिवायच नागरिकांना घरी परतावे लागले होते. आठवडय़ातील एकाच दिवशी हे प्रमाणपत्र मिळत असल्याने या आठवडय़ातील बुधवारी जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात ३५० ते ४०० रुग्णांनी रांगा लावल्या होत्या. या दिवशीही रुग्णालयातील दोनच संगणक सुरू असल्याने रुग्णांना तासन्तास रांगेत ताटकळत बसावे लागले होते. रुग्णालयाच्या आवारात अपंग व्यक्तींना बसण्यासाठी, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक अपंगांना उभे राहून किंवा जमिनीवर बसून आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा पाहावी लागते.

यासंदर्भात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. बी. सी केम्पी पाटील यांना विचारले असता त्यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र उपलब्ध कसे करून द्यावे या संदर्भात एकूण २७ डॉक्टरांना प्रशिक्षण देऊनही त्यांनी ती सोय सुरू केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

अन्य ठिकाणीही गैरसोय

अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाची गर्दी कमी व्हावी यासाठी महापालिकेंतर्गत शिवाजी रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय, कोरस येथे हे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी शासनाने निर्णय दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या अंतर्गत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र या प्रशिक्षणानंतरही या रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरित करण्यास सुरुवात झाली नसून आजही अपंग नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत.

किचकट प्रक्रिया

जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचल्यानंतर अपंगांना केसपेपरच्या रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर ऑनलाइन नोंदणीसाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर डॉक्टरांकडून रुग्णांना तपासण्यात येते. डॉक्टरांकडून रुग्णाला किती प्रमाणात अपंगत्व आहे याची माहिती दिल्यानंतर ती माहिती ऑनलाइनद्वारे यंत्रणेत साठविली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे प्रमाणपत्र उपलब्ध होते. या सगळ्या प्रक्रियेसाठी २०-३० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र गर्दी अधिक असल्यास या प्रकि ्रयेला अधिक वेळ लागत असल्याची माहिती देण्यात आली.

महापालिकेंतर्गत येणाऱ्या कोरस आणि कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र मुळातच संगणकासारख्या तांत्रिक गोष्टींची वानवा आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने अद्यापही येथे अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकत नाही. मुळातच शिवाजी रुग्णालयातील अनेक पदेदेखील रिक्त आहेत.   – डॉ. संध्या खडसे, अधीक्षक (शिवाजी रुग्णालय,कळवा)