वीज बिल भरणे नागरिकांसाठी सुखकर करण्यासाठी नायगाव पूर्व येथे फिरते वीज बिल भरणा केंद्र बुधवारपासून सुरू होणार आहे. याचा नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. तर त्यांचा वेळ तसेच पैशाची बचत होऊन वेळेत वीज बिलभरणा होऊन एम.एस.ई.डी.सी.एल. चीसुद्धा इष्टांकपूर्ती वेळेत होण्यास मदत होणार आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेअंतर्गत नायगाव पूर्व विभागाचा झपाटय़ाने विकास होत असून लोकसंख्या एक लाखाच्या घरात गेलेली आहे. नायगाव पूर्व विभागास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मार्फत विद्युतपुरवठा केला जातो. येथील ग्राहकांची संख्या ३० ते ३५ हजारांवर आहे.

जुचंद्र आणि वसई केंद्रावर वीज बिल भरण्यासाठी नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, वयस्क, वृद्ध नागरिकांची गैरसोय होत होती. त्यातच वीज ग्राहकांमध्ये वाढ होत असताना मात्र नायगाव पूर्ववासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच भविष्यात होणारी ग्राहक संख्या लक्षात घेता एम.एस.ई.डी.सी.एल.मार्फत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब होणे व नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधापुरवठा होणे नितांत गरजेचे होते.

नागरिकांची गैरसोय लक्षात घेता बँकेद्वारे वीज बीलभरणा करणेबाबत सभापती कन्हैया भोईर यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नायगाव पूर्व विभागात ‘फिरते वीज बिलभरणा केंद्र’ सुरू करावे अशी मागणी  एम.एस.ई.डी.सी.एल.चे कार्यकारी अभियंता भारती यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद लाभत एम.एस.ई.डी.सी.एल.मार्फत नायगाव पूर्व विभागाकरिता १५ ऑगस्टपासून ‘फिरते वीज बिलभरणा केंद्र’ची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन देण्यात आले. यामुळे नागरिकांचा वेळ तथा पैशाची बचत होऊन वेळेत वीज बिलभरणा होऊन एम.एस.ई.डी.सी.एल.चीसुद्धा इष्टांकपूर्ती वेळेत होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना दिलासा

नायगाव पुर्व परिसरातील वीज ग्राहकांना वीज देयके प्राप्त झाल्यानंतर भरणा करण्यासाठी जूचंद्र विभागीय कार्यालय किंवा वसई येथील कार्यालयात जावे लागते. परंतु वेळेत वीज बिले प्राप्त न होणे, त्याचप्रमाणे मर्यादित वीज बिल भरणा कालावधीमुळे नागरीकांना जूचंद्र व वसई कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या.