tvlog03 संगणकाने कामकाजाची परिभाषाच बदलली. जलद आणि अचूक कामासाठी संगणकीकरण अपरिहार्य ठरले. आधुनिकीकरणाने ग्रंथालयातील व्यवहारही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतात, मात्र अपुऱ्या निधीमुळे सार्वजनिक वाचनालयांना आधुनिक तंत्रप्रणालीचा अवलंब करता येत नाही. काही महाविद्यालयांतील ग्रंथालयांनी मात्र तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत ग्रंथालय क्षेत्रात आधुनिकतेचे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कल्याणमधील के. एम. अग्रवाल महाविद्यालय त्यांपैकी एक. या महाविद्यालयात १,८०० चौरस फूट जागेत ग्रंथालय तर १९२० चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेत अभ्यासिका आहे. आधुनिक तंत्रप्रणालीचा उपयोग करीत हे ग्रंथालय विद्यार्थ्यांना ग्रंथसेवा पुरवीत आहे.
ग्रंथालयाच्या कारभारात उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने आणलेली आधुनिकता आणि त्याचा विद्यार्थ्यांना होणारा उपयोग हेच या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. ३५ हजारांहून अधिक अभ्यासक्रमाची पुस्तके, सहा हजारांपेक्षा अधिक संदर्भग्रंथ, पुस्तक पेढीअंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी चार हजारांहून अधिक पुस्तके अशा विविध उपक्रमांनी महाविद्यालयाचे हे ग्रंथालय समृद्ध आहे. ग्रंथालयात पुस्तकांच्या देवाणघेवाणीसाठी दहा कर्मचारी तत्पर असले तरी सर्व कारभार संगणकामार्फत होत असल्याने ग्रंथालयाचा कारभार सुरळीत व जलद होत असतो. केवळ संगणकाचा वापर येथे होत नाही तर पुस्तक नोंदणी, देवघेव या सर्व कामकाजासाठी विद्यापीठाच्या ‘सोल दोन पॉइंट शून्य’ या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवघेव केली जाते. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रावर बारकोड देण्यात आलेला आहे. या बारकोडच्या नोंदणीमुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. त्या विद्यार्थ्यांच्या नावावर कोणते पुस्तक आहे याबद्दलही माहिती क्षणार्धात मिळते. या अंतर्गत दररोज जवळपास दोनशेहून अधिक पुस्तकांची देवघेव होत असते. केवळ पुस्तकेच नाहीत तर शंभर मासिके, चौदा वृत्तपत्रे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
ई-बुक प्रणाली हा आधुनिक ग्रंथालयाचा अविभाज्य घटक असतो. अग्रवाल महाविद्यालयातील ग्रंथालयही त्याला अपवाद नाही. या ग्रंथालयात आठ हजारांहून अधिक ई-बुक्स, पाच हजारांहून अधिक ई-जर्नल्स आहेत. ग्रंथालयात ओपॅक प्रणाली अस्तित्वात आहे. त्याचा वापर करून विद्यार्थी घरबसल्या ग्रंथालयातील त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांचा शोध घेऊ शकतात. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पण सध्या एखाद्या विद्यार्थ्यांकडे असलेल्या पुस्तकाची माहितीही या प्रणालीमुळे मिळू शकते. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर पुस्तकांची फिरती कपाटे आपल्या नजरेस पडतात. एखादा खजिना सुरक्षित ठेवावा तशी अभ्यासक्रमाची पुस्तके या फिरत्या कपाटात ठेवण्यात आली आहेत. तिजोरीसारखी असणारी ही कपाटे चक्राकार कडीने उघडता येतात. कपाट उघडताच आपल्यासमोर पुस्तकांचा खजिना खुला होतो. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत ई-झोन विभाग तयार करण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करता येतो. विद्यार्थी स्वत:चा लॅपटॉप आणून या ई-झोनचा वापर करू शकतात. येथील इंटरनेट सेवा विनामूल्य आहे. शिवाय येथे अभ्यासक्रमाच्या सीडी, डीव्हीडी ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कामासाठी होत असतो. ग्रंथालयात पुस्तक मित्र योजना राबवली जाते. या अंतर्गत एका विद्यार्थ्यांच्या नावावर पुस्तक नोंदणी करून त्या पुस्तकाचा लाभ त्या विद्यार्थ्यांसोबत इतर चार विद्यार्थी घेऊ शकतात. गोल्डन आयकार्ड ही या ग्रंथालयाची एक अनोखी योजना आहे, त्यात वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षांआधीच प्रत्येक विषयाचा संच अभ्यासासाठी दिला जातो.
नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती व्हावी यासाठी ग्रंथालयातर्फे ग्रंथालय ओळख शिबीर आयोजित केले जाते. याशिवाय विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुस्तक प्रदर्शन यांसारखे उपक्रम घेतले जातात. याबरोबरच सामाजिक बांधीलकीच्या भावनेने कल्याण शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळास गावात महाविद्यालयाच्या या ग्रंथालयाचे शाखा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूपच उपयोग होतो. वार्षिक दोनशे रुपये एवढय़ा माफक शुल्कात ग्रंथालयाची सुविधा पुरवली जाते.
के. एम. अग्रवाल महाविद्यालय, गांधारी,  कल्याण (प)
किन्नरी जाधव