ठाणे : ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात महाराष्ट्र पोलीस संघाने तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघाने विजेतेपद पटकाविले आहे. या दोन्ही विजेत्या संघांना महापालिकेने प्रत्येकी १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

व्यावसायिक पुरुष संघामध्ये एअर इंडिया संघाने द्वितीय पारितोषिक तर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि भारत पेट्रोलियम यांनी उपांत्य विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत एअर इंडिया संघातील उमेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट खेळाडूचे तर महाराष्ट्र पोलीस संघातील बाजीराव घोडके यांनी उत्कृष्ट पकडचे पारितोषिक पटकाविले. तसेच उदयोन्मुख खेळाडूचा किताब ठाणे महापालिका संघातील अक्षय भोईर यांनी तर महाराष्ट्र पोलीस संघातील नितीन थळे यांनी मालिकावीरमधील उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक पटकाविले. महिला गटात बँक ऑफ बरोदा यांनी द्वितीय तर एमरल्ड द इन्फ्रास्टक्चर आणि बालवडकर पाटील वेंचर्स यांनी उपांत्य विजेतेपद पटाकाविले. उत्कृष्ट पकडचे पारितोषिक बँक ऑफ बरोदाच्या साक्षी रहाटे यांनी, उदयोन्मुख खेळाडूचा? किताब लेयर टेक्नॉलॉजी संघातील ज्योती पवार यांनी तर मालिकावीरमधील उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक ठाणे महापालिका संघातील कोमल देवकर यांनी पटकाविले आहे.