व्यावसायिक संघ तयार करण्याची प्रक्रिया

ठाणे महापालिका शहरातील विकास प्रकल्पांची आखणी करून नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासोबतच आता प्रशासनाने स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही पावले उचलली आहेत. ठाणे महापालिकेचा व्यावसायिक महिला कबड्डी संघ तयार करण्यात येत असून यासाठी महिला कबड्डीपटूंचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा संघ ठाणे पालिकेच्या नावाने राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध कबड्डी स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून कला-क्रीडा महोत्सव तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महिला कबड्डी व्यावसायिक संघामध्ये खेळाडूंची कंत्राटी पद्घतीने निवड केली जाणार आहे. त्यामुळे या खेळाडूंना सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी दावा करण्याचा हक्क राहणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच एखादा खेळाडू अपेक्षित कामगिरी करत नसेल तर त्याचा करार रद्द करण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. अशाच प्रकारे पुरुष कबड्डीपटूंचाही व्यावसायिक संघ तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

ठाणे महापालिकेच्या वतीने महिला कबड्डीपटूंना दत्तक घेऊन त्यांचा व्यावसायिक संघ तयार करण्यात येणार आहे. या संघासाठी १२ खेळाडूंची निवड केली जाणार असून त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार पात्र खेळाडू तसेच जिल्हा आणि राज्य संघटनेच्या माध्यमातून या संघाची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ स्तरावर संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूंना संघामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

खेळाडूंना सुविधा..

संघात निवड झालेल्या खेळाडूंना सरावास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सराव किंवा स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास त्यावरील उपचार महापालिका रुग्णालयात मोफत करण्याची सुविधा खेळाडूंना पालिका देणार आहे. या खेळाडूंना सरावासाठी गणवेश तसेच स्पर्धेकरिता प्रवास खर्चही पालिकेकडून दिला जाणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.