सभागृहात एखाद्या गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणे अवघड झाले की सभा दहा मिनिटांसाठी तहकूब करायची, त्यानंतर तब्बल एक ते दीड तासाने ती सभा पुन्हा सुरू करायची, असे प्रकार वारंवार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान होत आहेत. शुक्रवारची सर्वसाधारण सभा मालमत्ता कर दर मंजुरीचा प्रस्ताव सभागृहात अडचणीत आल्यावर दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन तास म्हणजे दुपारी तीन ते संध्याकाळी सव्वासहा या वेळेपर्यंत सभागृहात कोणीही फिरकले नाही.
 सर्वसाधारण सभा सकाळी अकरा वाजता होती. ती सुरू होण्याला तब्बल सव्वाबारा वाजले. सभेच्या प्रमुख महापौर कल्याणी पाटील महापालिकेच्या आवारात घरातून साडेअकरा वाजता आल्या. उशिरा सभा सुरू होऊनही सभा सुरू करण्यासाठी लागणारी गणसंख्या नसल्याने काही वेळ नगरसेवकांची वाट पाहावी लागली. सभेच्या वेळा न पाळणे, काही मिनिटांसाठी सभा तहकूब करून ती वाट्टेल तेवढे तास पुढे सुरूच न करणे असे प्रकार वारंवार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बाबतीत घडत आहेत. यामध्ये महिला नगरसेविकांची कुचंबणा होते. घर, कुटुंब सांभाळून महिला नगरसेविका सभेला येतात. या तहकुबीच्या लपंडावामुळे सभागृह सुरू झाल्यानंतर अनेक महिला नगरसेविकांनी घरचा रस्ता धरलेला असतो.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता असलेली सर्वसाधारण सभा दुपारी सव्वाबारा वाजता सुरू झाली. त्यानंतर अन्य विषयांवर चर्चा झाली. दुपारी तीन वाजता मालमत्ता कराचा विषय सभागृहात आल्यानंतर पेचप्रसंग निर्माण झाला. महापौर कल्याणी पाटील यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ही तहकूब सभा बंद दालनातील खलबते, परिवहन सदस्यांचे उमेदवारी अर्ज भरणे आदी सोपस्कर पार पाडताना वेळ गेल्याने संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या वेळी सभागृहात तीस ते पस्तीस नगरसेविकांपैकी फक्त चार नगरसेविका उपस्थित होत्या.

कोणाचे हित?
येत्या आठ महिन्यांवर पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. येणाऱ्या काळात पालिका निवडणूक आचारसंहितेचा विचार करता चार ते पाच महिने पालिकेचे कामकाज होणार आहे. अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सभागृहात काम करण्याऐवजी सभा तहकूब करून, रेंगाळून नगरसेवक कोणाचे हित साधत आहेत. आणि सत्ताधारी शिवसेनेचे नेते आपल्या पदाधिकाऱ्यांना या रेंगाळण्याबाबत जाब का विचारत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी पालिका सचिव चंद्रकांत माने यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण सभा नियमित वेळेत सुरू करण्याचे बंधन पाळले जायचे. यासाठी स्वत: सचिव माने आग्रही असायचे. मागील काही वर्षे पालिकेला पूर्णवेळ व मनाजोगा सचिव मिळत नसल्याने प्रभारी पालिका अधिकाऱ्यांच्या गळ्यात सचिवपदाच्या माळा घातल्या जात आहेत.