बेकायदा फलकविरोधी मोहिमेत कल्याण-डोंबिवली पालिका दुटप्पी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या चौकाचौकांत बेकायदा फलक लावून विद्रुपीकरणाला हातभार लावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पराक्रमांकडे दुर्लक्ष करत व्यावसायिक आणि व्यापारी तसेच सामाजिक संस्थांच्या फलकांविरोधाची कारवाईची मोहीम काही दिवसांपासून प्रशासनाने हाती घेतली आहे.
बेकायदा फलक उभारणाऱ्यांविरुद्ध महापालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास पालिका आयुक्तांवरच कारवाईचा इशारा न्यायालयाने दिला आहे. कारवाईची अशी टांगती तलवार असताना, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नजरेतून राजकीय फलक सुटत आहेत.  
दोन दिवसांपासून कल्याणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक कैलास शिंदे यांच्या वाढदिवसाचे भव्य फलक जागोजागी झळकत आहेत. विजेचे खांब, शिवाजी चौक, बाजारपेठ चौकात हे फलक लावण्यात आले आहेत.
फलक काढण्यासाठी आणि दंडात्मक कारवाईसाठी तत्पर असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना नगरसेवकाचे झळकणारे फलक दिसत नाहीत का, असा सवाल काही नागरिक करत आहेत.
दरम्यान, तीन महिन्यांत पालिकेच्या सात प्रभाग क्षेत्रांमध्ये विनापरवाना फलक लावणाऱ्या ९६ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

सदिच्छादूत भीतीच्या छायेखाली
शहर परिसर कोणी विद्रुप केला तर त्याची माहिती न्यायालयाला देण्यासाठी विविध शहरांमध्ये न्यायालयाच्या आदेशावरून वकिलांना सदिच्छादूत म्हणून नेमण्यात आले आहे. व्यवसाय करून या दूतांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून शहर विद्रुप करणाऱ्यांची माहिती घ्यायची. ती न्यायालयाला द्यायची आहे, परंतु अनेक सदिच्छादूत अशा प्रकारे कारवाई झाली तर राजकीय नेत्यांकडून आपणास काही इजा होण्याची शक्यता वर्तवत आहेत.