डोंबिवलीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी आठवडय़ातून एकदा तरी डोंबिवलीत यावे अशी मागणी सातत्याने होत होती. प्रसारमाध्यमांनीही याविषयी आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत आयुक्त ई.रवींद्रन यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोंबिवलीत उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे.
नागरिकांना आपल्या काही समस्या मांडायच्या असतील तर कल्याणचे महापालिकेचे कार्यालय गाठावे लागते. एका कामासाठी कल्याणला जाण्यात नागरिकांचा बराचसा वेळ खर्ची जात असे. तसेच दिवसभर ताटकळूनही काम पूर्ण होईल याची शाश्वती नसे. ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा कल्याणच्या कार्यालयात जाणे शक्य होत नसे. त्यामुळे आयुक्तांनी आठवडय़ातून एकदा तरी डोंबिवली येथे यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनीही याविषयी आवाज उठविल्यानंतर आयुक्त रवींद्रन यांनी याचा विचार केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धीला निवेदन दिले आहे. डोंबिवलीकरांच्या सूचना, तक्रारी एकूण त्या सोडवण्यासाठी तसेच येथील कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आयुक्त रवींद्रन डोंबिवलीत येणार आहेत. अतिरिक्त आयुक्त संजय घरत हेही उपस्थित रहाणार आहेत. महिन्यातील चौथ्या मंगळवारी अतिरिक्त आयुक्त हे हजर रहाणार आहेत.