बेकायदा बांधकामप्रकरणी कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक अडचणीत

बेकायदा बांधकामप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सात विद्यमान नगरसेवक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सात विद्यमान आणि एका माजी नगरसेवकाने केलेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी (१-ड) कारवाईसंदर्भात विचार करण्यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्त पी.वेलरासू यांच्याकडे सादर झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काही बांधकामांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

अनधिकृत बांधकामाशी संबंधित एका लोकप्रतिनिधीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिले आहेत. गेल्या आठवडय़ात दोन नगरसेवकांनी नांदिवली येथील टी. के. म्हात्रे यांचा टी. के. ढाबा तोडल्याने प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याने आयुक्त पी. वेलरासू यांनी या प्रकरणांचा नव्याने अभ्यास सुरू केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. आयुक्त वेलरासू यांनी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना अनधिकृत बांधकामांशी संबंधित असलेल्या आणि अडचणीत असलेल्या नगरसेवकांच्या प्रभाग कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या नस्ती  सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त पवार यांनी काँग्रेस, शिवसेना, मनसे पक्षांशी संबंधित विद्यमान सात आणि एक स्वीकृत माजी नगरसेवक अशा एकूण आठ नस्ती आयुक्त कार्यालयात दाखल केल्या आहेत.

दाखल करण्यात आलेल्या तीन नस्तींमधील नगरसेवक हे माजी आहेत. हे तिन्ही नगरसेवक ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रभाग अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनधिकृत बांधकामांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तीन नगरसेवकांमध्ये बल्याणी प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक (प्रभाग क्र. ७) मयूरेश सुरेश पाटील, रामदासवाडी (प्र. क्र. २९) प्रभागाचे तत्कालीन शिवसेनेचे नगरसेवक विद्याधर भोईर, काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक नवीन सिंग यांचा समावेश आहे. मयूरेश पाटील यांच्या पत्नी नमिता पाटील सध्या प्र. क्र. ११ चे नेतृत्व करीत आहेत. विद्याधर भोईर यांच्या पत्नी प्रियंका भोईर रामदासवाडी प्रभागाच्या नेतृत्व करीत आहेत. एखादा नगरसेवक अनधिकृत बांधकामाशी संबंधित असेल तर त्याच्याशी संबंधित, अवलंबित व्यक्ती ही त्या बांधकामाला जबाबदार धरून त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे पाटील, भोईर या दोन्ही नगरसेविका अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उर्वरित पाच नगरसेवकांच्या नस्ती प्रभागाने डिसेंबर २०१६ मध्ये तयार केल्या आहेत. सात विद्यमान आणि एका माजी नगरसेवकावर महाराष्ट्र प्रांतिक कायद्यातील १० (१-ड) अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव नस्तींसह २१ डिसेंबर २०१६ रोजी अतिक्रमण नियंत्रण विभागाने तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे पाठविला होता. या नगरसेवकांवर कारवाई होऊ नये यासाठी काही राजकीय मंडळींनी जोर लावल्याची चर्चा होती.

नस्ती दाखल झालेले नगरसेवक

  • जान्हवी सचिन पोटे (प्रभाग-कोळसेवाडी)
  • राजाराम लक्ष्मण पावशे (शनिनगर)
  • प्रकाश गोपीनाथ भोईर (गावदेवी मंदिर)
  • सरोज प्रकाश भोईर (देवीचापाडा)
  • अर्जुन शांताराम भोईर (खडकपाडा)
  • मयूरेश पाटील (माजी नगरसेवक, सध्या त्यांची पत्नी नगरसेविका)
  • विद्याधर भोईर (माजी नगरसेवक, सध्या त्यांची पत्नी नगरसेविका)
  • नवीन सिंग (काँग्रेसपुरस्कृत स्वीकृत माजी नगरसेवक)

ज्या नगरसेवकांच्या नस्ती दोन ते तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्या आहेत, त्या आयुक्तांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्तांकडे नस्ती पाठविल्या होत्या. त्यावेळी कार्यवाही न होता त्या परत आल्या होत्या. आयुक्त या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील.

  सुरेश पवार, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका