शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

दिवसेंदिवस तोटय़ात चाललेल्या कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाचा (केडीएमटी) पांढरा हत्ती पोसणे अशक्य झाल्याने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी केडीएमटीचे खासगीकरण करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. गेल्या १९ वर्षांत उपक्रम स्वत:च्या बळावर चालू शकत नसेल तर, त्याचे खासगीकरण करावे, या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनंतर आयुक्तांनी ही भूमिका मांडली. यासंदर्भात शासनाचे मार्गदर्शन घेऊन १५ दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

केडीएमटीची बससेवा सुरुवातीपासूनच तोटय़ात चालली आहे. केडीएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. अनेक वेळा दोन-दोन महिने केडीएमटी कर्मचाऱ्यांचे वेतन उपक्रमाच्या तिजोरीत निधी नसल्याने होत नाही. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केडीएमटीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘शहरातील रहिवाशांची वाहतूक या उपक्रमातून केली जाते. त्यामुळे या उपक्रमाला सापत्न भावाची वागणूक देऊ नका,’ अशी भूमिका परिवहन उपक्रमातील कामगार संघटनेचे नेते आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सर्वसाधारण सभेत घेतली. तर, उपक्रमाच्या खासगीकरणाचा आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणी संदर्भात काय करता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे, असे नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सांगितले.

‘केडीएमटी उपक्रमाला ऊर्जितावस्था येऊ शकत नाही’ अशी भूमिका उपक्रमाचे व्यवस्थापक सुरेश पवार यांनी घेतली. त्यामुळे उपक्रमाची अवस्था काय आहे आणि त्याला पुढे काय भवितव्य आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी उपक्रम चांगल्या स्थितीत आणू, असे आश्वासन दिले पाहिजे. सध्या ठरावीक कर्मचारी उपक्रमात मौजमजा करीत आहेत. हे सगळे थांबविण्यासाठी खासगीकरण हाच एक पर्याय आहे, असे सभापती राहुल दामले यांनी सांगितले.

सभागृहाचे मत विचारात घेऊन आयुक्त बोडके यांनी खासगीकरणासंदर्भात सभागृहाकडून होणारा ठराव, शासनाचे मार्गदर्शन घेऊन केडीएमटीच्या खासगीकरणा-संदर्भात काय करता येईल, याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.