अबोली रंगाचे उभट आकाराचे अननसासारखे दिसणारे फळ सध्या ठाणे परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अननसासारख्या दिसणाऱ्या फळाचे नाव आहे ड्रॅगन. ड्रॅगनबरोबरच बोराच्या आकाराचे असलेले बेबी/ मिनी ऑरेंज तर बाहेरून तपकिरी पण आतून हिरवेगार असलेले किवी फळही तितकेच चर्चेत आहे. टपोऱ्या अ‍ॅप्पल बोराने स्वतंत्र रांगेत बसून आपला दरारा कायम ठेवला आहे.     
भारतीय बाजाराला परदेशी फळांनी भुरळ घातल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे व आसपासच्या परिसरांतही परदेशी फळांचा प्रभाव वाढत असल्याचे दिसू लागले आहे. उत्सुकता अथवा प्रतिष्ठेपोटी या परदेशी फळांची खरेदी ग्राहक मोठय़ा प्रमाणात करू लागले आहेत.  ड्रॅगन, किवी, मिनी ऑरेंज, प्लम, चेरी, अ‍ॅप्पल बोर यांसारख्या परदेशी फळांची मागणी ग्राहकांकडून वाढतांना दिसत आहे. पर्यटनामुळे परदेशी फळांचे आकर्षण वाढल्याचे ठाण्यातील गावदेवी बाजारातील फळ विक्रेते रामराज वर्मा यांनी सांगितले.  
 भारत हा खाद्यसंस्कृतीने नटलेला देश आहे. घरात असो वा बाहेर, भारतीय हे खाण्याच्या बाबतीत मागे राहत नाहीत. पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेले भारतीय तेथील फळांचा आस्वाद घेतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ही पाहुणी फळे आता अनोळखी राहिलेली नाहीत. पूर्वी फक्त उच्चभू लोकच अशी फळे खरेदी करीत होते. आता मध्यमवर्गही मोठय़ा प्रमाणात परदेशी फळे पसंत करू लागला आहे.
 ड्रॅगन हे फळ थायलंड, तर किवी हे फळ न्यूझीलंड येथून भारतात आले. रंगाने अबोली असलेले हे अननसासारखे दिसणारे ड्रॅगन फळ मूळचे चीनचे. बाहेरून शेंडीयुक्त असे हे फळ आतून मात्र तुळशीच्या बीसारखे आहे. किवी हे फळ बाहेरून तपकिरी रंगाचे पण आतून दिसायला हिरवेगार तर चवीला आंबट आहे. नागपूरच्या आंबट-गोड संत्र्यांचा छोटा भाऊ भासणारे बेबी/ मिनी ऑरेंज हे चीनमधून भारतात येतात.
गेल्या तीन वर्षांपासून या बेबी ऑरेंजची मागणी बाजारात वाढताना दिसते आहे. चार-पाच वर्षांपूर्वीही या परदेशी फळांनी भारतीय बाजारपेठेत येण्याचा खटाटोप केला होता. मात्र फारशी मागणी नसल्याने त्यांची किंमत जास्त होती. परंतु याच फळांना चांगला प्रतिसाद दिल्याने त्यांचा बोलबाला वाढत आहे.
समीर पाटणकर, ठाणे

ग्राहकांच्या मागणीप्रमाणेच निवडक फळे आम्ही वाशी बाजारातून आमच्या दुकानात विक्रीसाठी आयात करतो. ड्रॅगन हे फळ उर्वरित परदेशी फळांमध्ये विशेषत: लोकप्रिय होत असून दिवसाला अंदाजे एक ते दीड खोका म्हणजेच वीस ते तीस फळांचा खप आहे.
-फळ विक्रेता, गावदेवी बाजार, ठाणे.

ड्रॅगन या फळाला चाट मसाल्याची जोड मिळाल्याने त्याची रंगत वाढली. तसेच किवी हे फळ आंबट असूनही त्याला एक वेगळी चव असल्याने ते आवडले.
-ज्योत्स्ना आष्टेकर, ठाणे.

ड्रॅगन, किवी या फळांमध्ये पचनास उपयुक्त अशा घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या फळांच्या सेवनामुळे पचन होण्यास मदत होते. तसेच कॉलेस्ट्रेरॉलसारख्या शरीरातील अपायकारक घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते
-ऐश्वर्या जयराम, डोंबिवली.