18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कोकण पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी नव्याने

आजपासून नोंदणीला सुरुवात; सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत

प्रतिनिधी, ठाणे | Updated: September 28, 2017 2:31 AM

आजपासून नोंदणीला सुरुवात; सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत

पुढील वर्षी जुलै महिन्यात होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी येत्या २८ सप्टेंबरपासून नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. या मतदारसंघासाठी सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तब्बल पावणेदोन लाख मतदार होते. या सर्व मतदारांची यादी नियमाप्रमाणे रद्द केली जाणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदार नोंदणीचा घोळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने तातडीने नव्याने नोंदणी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत  मतदार नोंदणीवरून बराच वादंग झाला होता. जुनी यादी रद्दबादल करून नव्याने नोंदणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली होती. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी यंदा निवडणूक आयोगाने दक्षता घेतली असून पदवीधर मतदारांची जुनी यादी पूर्णपणे रद्द केली जाणार आहे. या मतदारसंघासाठी येत्या २८ सप्टेंबरपासून सुरू होणारी नोंदणी ६ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच १९ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

तसेच सामान्य मतदारांना पूर्वी दुसऱ्या ठिकाणी मतदार यादीत असलेले नाव रद्द करण्यासाठी ७ क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक होते, मात्र ‘ईआरओ-नेट’ यंत्रणेच्या माध्यमातून त्या मतदारसंघातील नोंदणी अधिकाऱ्यास संबंधित मतदाराची माहिती संगणक यंत्रणेच्या माध्यमातून पाठविण्यात येते. तसेच नवीन मतदारांना स्मार्ट कार्ड्स देण्यात येणार आहेत.

मतदार नोंदणीसाठी अर्ज

मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी नमुना अर्ज (६), अनिवासी भारतीयांसाठी मतदार नोंदणी करण्यासाठी नमुना अर्ज (६अ), दोन वेळा नोंद असलेल्या, मृत किंवा स्थलांतरित मतदारांचे नाव वगळण्याकरिता नमुना अर्ज (७), मतदार यादीतील मतदारांचे नाव, पत्ता, जन्म दिनांक व इतर तपशील दुरुस्तीकरिता नमुना अर्ज (८), मतदारसंघातील एका यादीभागातून दुसऱ्या यादीभागातील पत्त्याच्या बदलाकरिता नमुना अर्ज (८ अ) असे  अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नवमतदारांच्या टक्केवारीत ठाणे दुसरा

निवडणूक आयोगाने मतदारांची नोंदणी वाढावी यासाठी सुरू केलेल्या विविध मोहिमांच्या माध्यमातून गेल्या वर्षी तुलनेत यंदा ८६ हजार ६७६ नव्या मतदारांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात एकूण ५६ लाख ८६ हजार ६७६ एवढी मतदारांची संख्या झाली आहे. मतदारांचा टक्का वाढण्यात ठाणे जिल्ह्य़ाचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे, असा दावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

मतदार नोंदणी कालावधी

वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या जिल्ह्य़ातील व्यक्तींना ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. रविवार, ८ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर रोजीदेखील यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. यासोबतच ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती कार्यालयांमध्येदेखील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

First Published on September 28, 2017 2:31 am

Web Title: konkan graduate election voter registration starting from today