कोकण मराठी साहित्य परिषद रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असून या निमित्ताने ठाणे जिल्ह्य़ातील गावागावांपर्यंत संपर्क करण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्य़ात ‘कोमसाप’चा विस्तार करण्यास व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्य़ात बारा शाखांचे जाळे विणण्यात आले आहे. आगामी काळात गावागावांपर्यंत पोहोचण्यासाठी कोमसापच्या वतीने विविध साहित्यिक आणि ग्रंथ पोहोचविण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
दोन वर्षांपासून ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत तिरोडकर यांनी केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर काम पोहोचवले आहे. काहूर, शशिबिंब, अक्षमाया या काव्यसंग्रहासह मिठी नदी या लोकप्रिय काव्यलेखन तिरोडकर यांनी केले. गोव्यातील बा. भ. बोरकरांच्या गावी झालेल्या काव्य संमेलनाचे ते प्रमुख होते. तर कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध कवी किरण येले, कार्यवाहकपदी, सुनील बडगुजर, सह कार्यवाहक योगेश जोशी, कोषाध्यक्ष मनीष पाटील यांची निवड झाली. तर सदानंद राणे, मेघना साने, गिरीश कंठे, नितीन विंचुरे, डॉ. नरसिंह इंगळे, किरण गायकवाड, डॉ. भालचंद्र घाटे आणि प्राध्यापक एम. आर. निकम अशी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिले पुष्प ठाण्यात मार्चमध्ये दोन दिवसांच्या चर्चासत्राच्या माध्यमातून होणार आहे.