गुजरातमधून होणारी आवक बंद झाल्याने बाजारात भेंडीची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे दरही गगनाला भिडले आहेत. एकीकडे वाशी आणि कल्याण येथील घाऊक बाजारात भेंडी ३० ते ३६ रुपये किलो दराने विकली जात असताना ठाण्यातील किरकोळ बाजारात मात्र, तिने १०० रुपयांचा दर गाठला आहे.
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.
या काळात भेंडीचे दर स्थिर होते, परंतु गुजरातमधून होणारी भेंडीची आवक थांबल्याने भेंडीही आता भलतीच महाग होऊ लागली आहे. गुजरातच्या भेंडीला पर्याय म्हणून व्यापारी फलटण आणि शहापूर भागातील भेंडी मागवू लागले असल्याची माहिती ठाण्यातील गोखले रोडवरील किरकोळ व्यापारी रवी कुर्डेकर यांनी दिली.  
शहापूर भागातून येणारी भेंडी साठ रुपये किलो दराने मिळते. कल्याण आणि वाशी भाजी मार्केटमधून ठाणे शहरामध्ये भाजी आणली जाते. वाशी येथील घाऊक बाजारात भेंडी सरासरी ३५ रुपये, तर कल्याणमध्ये ३० रुपये किलोने उपलब्ध आहे. तर ठाणे शहरातील किरकोळ बाजारपेठेत ७० ते ८० रुपये किलोने मिळणारी भेंडी आता शंभरीपर्यंत पोहोचली आहे.

वाटाणे, फरसबीही शंभरीच्या वाटेवर
भेंडीपाठोपाठ आता हिरवे वाटाणे आणि फरसबीही शंभरीच्या वाटेवर आहेत. बुधवारी ठाण्याच्या किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा (मटार) ९० ते ९५ रुपये, तर फरसबी ७० रुपये किलो आहे.
शलाका सरफरे, ठाणे</strong>