रक्षाबंधन हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. बहिण आपल्या भावाला राखी बांधून हा सण साजरा करते. परंतु काही बहिणी अशा ही आहेत की, ज्यांच्या हातून काही कारणास्तव गुन्हे घडतात आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागतो. या भगिनी आपल्या भावाबरोबर रक्षाबंधन सण साजरा करू शकत नाही. पण त्यांनी साकारलेली कलाकृती हीच आपल्या भावासाठी एक भेट असते. याचंच एक उदाहरण म्हणजे ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांनी चार भिंतीच्या बाहेरील जगात वावरत असलेल्या बहिणींना त्यांच्या भावाच्या हातावर बांधण्यासाठी तयार केलेल्या राख्या. यंदा या महिला कैद्यांनी बनविलेल्या राख्यांना मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. विशेष म्हणजे आज सर्वत्र महागाई वाढली असताना बाजारातील तुलनेत या राख्यांचे भाव तिपटीने कमी आहेत.

आजच्या घडीला देशात सर्वत्र महिला सबलीकरणाचा संदेश दिला जात असताना हा उपक्रम स्तुत्य ठरत आहे. महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिल्याने त्यांनी विविध क्षेत्रात मोठी भरारी मारली आहे. परंतु अशाही काही महिला आहेत ज्यांना परिस्थितीपायी चुकीचा मार्ग पत्करावा लागला त्यातून त्यांच्या हातून चोरीसारखे काही गुन्हे घडल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच कायमचा बदलला.

आजच्या घडीला अशाप्रकारे विविध गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या ९० महिला कैदी ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहेत. या महिला कैद्यांना त्यांच्या भावी आयुष्यात तुरुंगातून बाहेर पडल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये शिवणकाम, बेकरी यासारख्या प्रशिक्षण वर्गांचा समावेश आहे. याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून या कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी एका सामाजिक संस्थेकडून राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावेळी १२ महिलांनी अवघ्या काही दिवसांत सर्व गोष्टी व्यवस्थितपणे आत्मसात केल्या. त्यानंतर तुरूंग प्रशासनाकडून या महिलांना राखी तयार करण्याचे सर्व साहित्य पुरवण्यात आले. तेव्हा या महिलांना १२ प्रकारच्या तब्बल ६०० राख्या बनवल्या, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. या राख्या सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर असलेल्या तुरुंग विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. अवघ्या ६ ते १० रूपये इतकी किंमत असल्यामुळे अनेकजण या राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बाजारात याच राख्यांची किंमत साधारण ३५ ते ४० रूपयांच्या आसपास आहे. त्यामुळे साहजिकच नागरिक तुरूंगातील राख्यांना झुकते माप देत आहेत, असे तुरुंग अधिकारी कापडे यांनी सांगितले.