मराठी माणसाला मातृभाषेत कुणाशीही संवाद साधताना कमीपणा वाटतो. ते हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करतात. भाषेचा उत्सव साजरा करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून हाच अभिमान आपण सर्व दिवशी बाळगला पाहिजे, असे मत ज्येष्ठ कलाकार, लेखक मदन जोशी यांनी व्यक्त केले.
कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक कविता तुमची एक कुसुमाग्रजांची’ हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका शर्मिला पंडित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी घरात सगळे पाहुणे शिरले की त्या घरातील यजमानाला एका कोपऱ्यात थांबावे लागते. तशीच स्थिती आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेची झाली आहे. नोकरी-धंद्या निमित्ताने इतर परप्रांतीय आपल्या राज्यात शिरले असून त्यांनी भाषेच्या निमित्ताने उपलब्ध असलेली मोकळी जागा बळकावायला सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले. रसिकांनी एक कविता कुसुमाग्रजांची आणि त्यासोबत स्वत:च्या कवितेचे वाचन या वेळी केले. यात अनेकांनी आपल्या काव्यात महाराष्ट्रात बेळगाव का नाही, बेळगावात मराठी माणसांची होत असलेली हेळसांड, त्यांच्यावर झालेले अन्याय आदी गोष्टींना वाचा फोडण्यात आली होती. संस्थेच्या चिटणीस आशा जोशी यांनी प्रास्ताविक सादर केले.
ठाण्यात लवकरच ग्रंथदालन  
ठाणे: वाचन संस्कृतीत योगदान असणाऱ्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने आता ही चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यासाठी प्रकाशकांसाठी खास ग्रंथदालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रंथालयाने यापूर्वीच ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे शहरातील विविध भागांत मोबाइल व्हॅनद्वारे ठिकठिकाणी ग्रंथ नेले जातात. आता ग्रंथालय इमारतीच्या आवारात एक कायमस्वरूपी ग्रंथदालन उभारण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकाशन संस्थांची पुस्तके प्रदर्शन तसेच विक्रीसाठी या दालनात ठेवण्यात येतील. या योजनेचे पत्र राज्यातील सर्व प्रकाशकांना पाठविण्यात आले आहे. ठाणे जिल्हय़ात शासन मान्यता असलेली १४३ ग्रंथालये आहेत. त्यांना या ग्रंथदालनातून पुस्तके खरेदी करता येतील. विविध विषयांवरील आठ ते दहा हजार पुस्तके असतील.