ऋषिकेश मुळे

दादोजी कोंडदेव स्टेडियम क्रिकेटपटूंसाठी खुले करून देताना अ‍ॅथेलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंकडे पाठ फिरवणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंथेटिक धावपट्टीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेतील काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव या ठिकाणी क्रिकेटसाठी नवी खेळपट्टी आणि मैदान तयार करण्यात आले. ही सुविधा पुरविताना अ‍ॅथेलेटिक्सपटूंसाठी आखण्यात आलेल्या सुविधांकडे कानाडोळा केला जात असल्याच्या तक्रारी होत्या.

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात रणजी क्रिकटचे सामने खेळवण्याचे बेत आखणाऱ्या ठाणे महापालिकेने या क्रीडाप्रेक्षागृहात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या धावपट्टीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले होते.

रणजी सामने खेळवण्यासाठी ही धावपट्टी हटवून स्वतंत्र मार्गिका काढण्याचा पालिकेचा विचार होता. दरम्यान, धावपट्टी खराब होऊनही तिची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनीच्या सहा खेळाडूंना सरावासाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. तर तब्बल दोन हजार खेळाडू प्रेक्षागृहातील पायऱ्यांवर सराव करत होते. महापालिकेने काही दिवस क्रीडाप्रेक्षागृहातील मैदानावर सरावाकिरता अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंना बंदी घातली होती. क्रिकेटचे सामने तसेच वेबसीरिजचे छायाचित्रीकरण यांसारख्या विविध कारणांमुळे अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंना मैदानातील सरावावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मैदानाऐवजी क्रीडाप्रेक्षागृहाच्या बाहेरील आवारात खेळाडू सराव करत असत.

जिल्ह्य़ातील अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंची गरज लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपूर्वी सिंथेटिक धावपट्टीची मागणी झाली. महापालिकेने सिंथेटिक धावपट्टी बांधली. मात्र हे बांधकाम अपूर्णच राहिले. ४०० मीटरऐवजी महापालिकेने फक्त २०० मीटर धावपट्टीचेच काम पूर्ण केले. त्यामुळे या दरम्यान अपुऱ्या सिंथेटिक्स धावपट्टीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स खेळांचा सराव करायचा तरी कसा असा प्रश्न खेळाडूंपुढे निर्माण झाला होता. महापालिकेकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. महापालिकेच्या या दुटप्पी धोरणाविषयी खेळाडू तसेच पालकांमध्ये नाराजीचा सूर होता.

अखेर निविदा

* अपुऱ्या अवस्थेत काम केलेल्या सिंथेटिक्स धावपट्टीची महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून निविदा मागवण्यात आली आहे. २०० मीटर सिंथेटिक्स धावपट्टीच्या कामाकरिता ९३ लाख ७८ हजार ६९७ रुपयांची ठाणे महापालिकेतर्फे निविदा मागविण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी पावसाळा वगळून चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

* अ‍ॅथलेटिक्स खेळामध्ये पाच हजार मीटर धावण्यासाठी धावपट्टी आवश्यक असते. १०० मीटर अडथळा शर्यत धावपट्टी आवश्यक असते. तीन हजार मीटर स्टीपल चेस, लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, रीले आदी खेळासाठी मैदान आवश्यक आहे.

४०० मीटरपैकी २०० मीटरच्या सिंथेटिक्स धावपट्टीचे काम पूर्ण झाले होते. आता पुढील २०० मीटरचे काम पूर्ण करण्याच्या कामाची निविदा मागवण्यात आली आहे. या धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना फायदा होईल.

– मीनल पालांडे, क्रीडा अधिकारी, ठाणे महापालिका

४०० मीटरची सिंथेटिक्स धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना चांगल्या प्रकारे सराव करता येईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्सचा खेळाचा सराव या धावपट्टीवर चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

– नीलेश पातकर, अ‍ॅचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब