23 October 2019

News Flash

कसारा घाटात महामार्गावर बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल

स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी सांगितले.

मुंबई – नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ खरा असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नाशिक, सिन्नर, संगमनेर याठिकाणी ऊसाची शेती असून त्याठिकाणाहून बिबट्या आला असावा असा अंदाज शहापुरच्या वनाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

कसारा घाटापासून जवळच मध्यवैतरणा जलाशय व त्यालगत असलेले अनेक पाणवठे तसेच तानसा अभयारण्यात निसर्गनिर्मित पाणवठ्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळेच रखरखीत उन्हाच्या झळांपासून स्वतःच्या बचावासाठी बिबटे तानसातील पाणवठ्यांकडे आकर्षित होत आहेत. मात्र त्यासाठी बिबट्यांना कसारा घाटातील मुंबई – नाशिक महामार्ग ओलांडावा लागत असल्याने हे बिबटे कसारा घाटात आढळू लागले आहेत.

पहा व्हिडिओ:

महामार्गावरील संचाराने बिबट्यांना देखील धोका निर्माण झाला असून भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावर बिबट्याच्या संचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कसारा घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुंबई – नाशिक महामार्गावर कसारा घाटात बिबट्या आढळून आला असल्याचे वृत्त  खरे असून या महामार्गावर वन कर्मचाऱ्यांचे दक्षता पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी सांगितले.

First Published on April 18, 2019 3:36 pm

Web Title: leopard found walking on mumbai nashik highway kasara ghat video viral