नवी मुंबई येथील वाशी भागात राहणाऱ्या जगमोहनसिंग ठाकूर (६५) याला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुरुवारी ठाणे न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नवी मुंबई येथील वाशी परिसरात जगमोहनसिंग हा कुटुंबासोबत राहत होता. ७ ऑक्टोबर २०१३ रोजी त्याने किरकोळ वादातून पत्नी आशा हिच्या डोक्यात हातोडा मारला होता. राहत्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तो घरातून पसार झाला होता. त्याची सून सकाळी आशाच्या खोलीत गेली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी त्याचा मुलगा तुषार याने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी जगमोहनसिंगविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायलयात झाली. सरकारी वकील संजय लोंढे यांनी न्यायालयामध्ये सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.

रवी पुजारीच्या गुंडाला अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडाविरोधी पथकाने शस्त्र पुरविणाऱ्या रवी पुजारीच्या हस्तकाला ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून अटक केली आहे.
हा गुंड गेली तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. अविनाश कैलास प्रसाद ऊर्फ छत्रपाल असे या गुंडाचे नाव आहे. १६ मार्चला छापा टाकून छत्रपाल याला ताब्यात देण्यात आले.