कापुरबावडी येथील उड्डाण पुलावरील मुंबई दिशेची मार्गिका घोडबंदर तसेच भिवंडी भागातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोयीस्कर ठरणार असली तरी ही मार्गिका खुली करण्यास स्थानिक रहिवाशांनी सोमवारी कडाडून विरोध केला. या पुलामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होणार असून ती रोखण्यासाठी शासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तसेच या पुलावरील वळणे अतिशय धोकादायक असल्याने अपघातांची शक्यता आहे. असे अपघात होऊ नयेत यासाठीही कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. पुलाची उभारणी करण्यापूर्वी यासंबंधी स्थानिकांना आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही, असा आरोप करीत येथील ऋतुपार्क तसेच आसपासच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी सोमवारी निषेधाचे सूर लावले. रहिवाशांच्या या आंदोलनास भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी साथ दिली. त्यानंतरही सायंकाळी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या उपस्थितीत ही मार्गिका सुरू करण्यात आली.
ठाणे ते घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी भागातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या पुढाकाराने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला असून त्यासाठी तब्बल १७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. वर्षभरापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होताच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलावरील मुंबईहून घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणाऱ्या तसेच घोडबंदर व भिवंडीहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गिका त्या वेळी वाहतुकीसाठी यापूर्वीच खुल्या करण्यात आल्या आहेत. घोडबंदरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या कामात काही त्रुटी समोर आल्या होत्या. त्यामुळे ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली नव्हती. काही महिन्यांपूर्वी या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. तरीही ती वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत नव्हती. त्यामुळे मुंबई दिशेने जाणारी वाहतूक कापुरबावडी पुलाखालून सुरू असल्याने कापुरबावडी चौक आणि माजिवाडा भागात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या कोंडीमुळे वाहनचालक व नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. या उड्डाणपुलाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर सोमवारी सायंकाळी ही मार्गिका खुली करण्यात आली.
या पुलाची उभारणी करण्यापूर्वी या भागात राहणाऱ्या रहिवाशांना काही आश्वासने देण्यात आली होती. पुलामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिरोधक भिंती तसेच पुलावरील वळणांमुळे अपघात होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळास दिले होते. प्रत्यक्षात पुलाचे काम पूर्ण करताना या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. पुलाची मार्गिका सुरू करण्यापूर्वी ही कामे मार्गी लावा, अशी रहिवाशांची मागणी होती. रहिवाशांचा दबाव लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी या प्रकरणी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. एवढा सर्व खटाटोप करूनही काहीच साध्य होत नसल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी सोमवारी निषेधाचा सूर लावला.