ठाण्यातील गौतम प्राथमिक-माध्यमिक विद्यालयातील प्रकार; पालकांमध्ये संताप

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करताना वर्गात मोठा आवाज झाला म्हणून संतापलेल्या शाळेच्या विश्वस्तच्या पत्नीने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या दांडय़ाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकारात तब्बल ७९ विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे पालकांकडून सांगण्यात येत असून त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये काहींचे हाताचे हाड मोडले , तर काहींना मुका मार लागला आहे. या घटनेमुळे संतापलेल्या पालकांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी शाळेचे विश्वस्त आशीष गौतम आणि त्यांची पत्नी शिल्पा या दोघांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

ठाणे स्थानक परिसरातील प्रभात सिनेमागृहाजवळील एका तीन मजली इमारतीमध्ये हिंदू मिशन एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे गौतम प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यात येते. ही शाळा हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची असून या ठिकाणी ठाणे, कळवा तसेच आसपासच्या परिसरांतील विद्यार्थी शिकतात. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये येत्या २८ फेब्रुवारीला शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या तयारीत आवाज झाल्यामुळे शाळेच्या विश्वस्तची पत्नी शिल्पा गौतम हिने विद्यार्थ्यांना मारहाण केली. स्नेहसंमेलनाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच त्या मजल्यावर असलेल्या इतर वर्गातील विद्यार्थ्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीबाबत माहिती मिळाल्यानंतर पालकांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तिथे शाळेचे विश्वस्त आशीष गौतम हे आले आणि त्यांनी माफी मागत दुसऱ्या दिवशी पालकांची बैठक बोलावली.

त्या वेळेस त्यांची पत्नी उपस्थित नसल्यामुळे पालक संतापले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी पुन्हा धाव घेतली, अशी माहिती एका पालकाने दिली. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे राज्याचे महासचिव अक्षय कोळीही यांनीही या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  मार लागलेल्या १८ विद्यार्थ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असलल्याचे ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले.

झाले काय?

शाळेतील एका विद्यार्थ्यांने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी शाळेच्या वर्गातील बाकांना एका बाजूला करून परिसर मोकळा करण्यात आला होता. सराव झाल्यानंतर ती बाके पुन्हा जागेवर ठेवत असताना मोठा आवाज झाला. त्यामुळे शाळेच्या विश्वस्तची पत्नी शिल्पा गौतम हिने एकेका विद्यार्थ्यांला घरात नेऊन प्लॉस्टिक दांडय़ाने मारहाण केली. त्यासाठी तिने शाळेच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक बंद केला होता आणि तिच्या घराजवळ असलेला प्रवेशद्वार खुला ठेवला होता. तेथून जात असताना तिने हा प्रकार केला.

पालक संतप्त..

गौतम विद्यालयामध्ये मुलगा आठवीत तर मुलगी दहावीमध्ये शिकते. परीक्षा तोंडावर आली असताना या मारहाणीमुळे मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर मुलाला मुका मार लागला आहे, अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली, तर या शाळेमध्ये माझी मुलगी आठवीत शिकत असून तिला फुप्फुसाचा त्रास असतानाही मारहाण करण्यात आल्याचे रामनिवास बेहनवाल या पालकाने सांगितले.