‘कुजबुजल्या’ जाणाऱ्या विषयांची ‘लोकसत्ता लोकांकिके’त परिपक्व हाताळणी

‘व्हर्जिनिटी’, ‘सेक्स’, ‘पॉर्न’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, ‘देहविक्री’ आणि पती-पत्नींमधील शारीरिक संबंध.. खरं तर समाजात अगदी खासगीतही कुजबुज करूनच चर्चिले जाणारे हे विषय. याकडे बघण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन, त्यांतील श्लील-अश्लीलतेमध्ये असलेली अतिशय बारीक मर्यादा आणि त्याबद्दलचे गैरसमज या गोष्टींमुळे महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये असे विषय अपवादानेच येतात; परंतु त्यामुळेच की काय, या विषयांबद्दलचा ‘टॅबू’ दूर करण्यासाठी यंदाच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे येथील प्राथमिक फेरीत या विषयांची परिपक्व हाताळणी करणाऱ्या लोकांकिका सादर करण्यात आल्या.

स्त्री-पुरुषांमधील भेदभाव, लैंगिकतेकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन आणि अनेक चुकीच्या संकल्पनांवर थेट आणि स्पष्टपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न लोकांकिकेच्या व्यासपीठावरून तरुणाईने केला. त्यांच्या या प्रयत्नांना उपस्थित परीक्षक आणि मान्यवरांनीही दाद दिली.

’ सेकण्ड हॅण्ड : वयात आलेला तरुण लग्नापूर्वी मित्रांच्या प्रोत्साहनाला बळी पडून एका मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. एकदाच झालेल्या त्या भेटीनंतर ‘ती’ला विसरूनही जातो. मात्र, आईवडिलांनी पसंत केलेली मुलगी पाहण्यासाठी तो जातो, तेव्हा त्याच मुलीशी त्याची गाठ पडते. यातून उलगडले जाणारे प्रसंग ‘सेकण्ड हॅण्ड’ एकांकिकेतून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषी अहंकार, सध्याचा समाजाचा दृष्टिकोन, मुलींना उपभोग्य वस्तू म्हणून केली जाणारी हेटाळणी आणि त्यावर मात करून मुलीकडून स्वत:चे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न या एकांकिकेत भाईंदरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

’ द्वंद्व : वेश्या व्यवसायात असलेल्या तरुणींचे होणारे शोषण, त्यांची विदारक परिस्थिती आणि त्यांची होणारी फसवणूक मांडण्याचा प्रयत्न ‘द्वंद्व’ या एकांकिकेच्या माध्यमातून वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने केला. देहविक्री करणाऱ्या तरुणीची कथा आणि संवादामधूनही या तरुणांनी हा विषय खुलवण्याचा प्रयत्न केला. ‘‘पोटाची भूक भागवण्यासाठी इथे शरीराची फोडणी द्यावी लागते’’,

अशा संवादामधून या व्यवसायाकडे वळलेल्या तरुणींची अगतिकता दाखवण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे.

’ दिल-ए-नादान : लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या एका जोडप्याची कथा विरारच्या विवा महाविद्यालयाने सादर केली. लग्नापूर्वी मैत्रिणीकडून ऐकलेल्या चुकीच्या समजुतीमुळे पतीपासून दूर होणारी पत्नी या एकांकिकेमध्ये दिसून येते. तिला समजून घेत, कधी रागवत तिला जवळ घेणारा पती यांच्यातील शाब्दिक चकमकी या एकांकिकेमध्ये दिसते.

याच पाश्र्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या एका तरुणीची विवाहित मुलीशी भेट होते आणि तिच्या समुपदेशनानंतर तिला सुखी संसाराची वाट सापडते. ही कथा ‘दिल-ए-नादान’मध्ये साकारण्यात आली आहे. ‘एैयाशी तो जिस्म करता है, दिल-ए-नादान होता है’ या संवादातून प्रेमाचा उलगडा करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे.

आधुनिक काळामध्ये आपण पोहोचलो असलो तरी अद्यापही अनेकांपर्यंत लैंगिकतेविषयी अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे निर्माण होणारा गुंता दूर करण्याचा प्रयत्न एकांकिकेतून केला आहे. लैंगिक शिक्षणाविषयी मुलींशी प्रामुख्याने उघडपणे बोलले जात नसल्यामुळे सर्वाधिक कुचंबणा त्यांचीच होते. अशा वेळी तिची मानसिकता दुसरी महिला समजू शकते, हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला.

– शार्दूल आपटे, अभिनेता, दिल-ए-नादान 

घरातूनच मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो, त्यामुळे मुलींच्या जगण्यावर अनेक बंधने लादली जातात. कुतूहलापोटी त्यांच्याकडून काही चुकीची पावले उचलली जाण्याची शक्यता असते. मात्र त्या एका कारणावरून तिला आयुष्यभर दोष देणे नेहमीच चुकीचे आहे.  मुलींनाही मोकळीक देऊन त्यांच्याबद्दल चुकीचे मत निर्माण करणे थांबवा, हेच सांगण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून केला.

– सिद्धेश उपकारे, अभिनेता, सेकण्डहॅण्ड