कल्याण-डोंबिवली शहरातील पाणी व्यवस्थापनाची सद्य:स्थिती काय आहे.. पाणी योजनांची क्षमता वाढवण्यासाठी तुमच्या पक्षाकडे कोणत्या उपाययोजना आहेत.. शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका काय करते.. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेकडे कोणकोणते पर्याय आहेत.. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहे.. अशा शहरविषयक विविध प्रश्नांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या युवा नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कल्याण-डोंबिवली शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला. कल्याणच्या ब्राह्मण सोसायटीच्या सभागृहात आयोजित ‘लोकसत्ता ठाणे’च्या ‘कट्टय़ावरची गोलमेज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध पक्षाच्या युवा नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील शहर कसे असेल याचा सविस्तर आराखडा उपस्थितांसमोर मांडला. या उपक्रमास शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, भाजपचे रितेश फडके, मनसेचे सुनील प्रधान, काँग्रेसचे राकेश मुथा, राष्ट्रवादीचे सुभाष गायकवाड हे विविध पक्षांचे युवा नेते उपस्थित होते.

आरोग्यसेवा

महापालिका रुग्णालय भीतीदायक

शहरातील आरोग्याचे प्रश्न अत्यंत गंभीर झाले आहेत. आरोग्याच्या तक्रारी निवारणासाठी शहरात असलेली रुग्णालये महागडी असताना त्यांना पर्याय असलेले महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय मात्र भीतीदायक अवस्थेत आहे. तेथे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असून वाहतुकीच्या प्रश्नामुळे तेथे रुग्णवाहिका न पोहोचण्याचे प्रकार घडले आहेत. यावर महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक लक्ष देणार की नाही.
-’हर्षद कुलकर्णी, यंग इंडिया

पालिकेची जबाबदारी झटकण्याची भूमिका

शहरातील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न असून ते निवारण्याची जबाबदारी ही पालिकेची असताना या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पालिकेतील सत्ताधारी गंभीर नाहीत, हे आजचे वास्तव आहे. आरोग्याच्या प्रश्नावर आजवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
-’सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

 

अद्ययावत रुग्णालयासाठी पाठपुरावा

महापालिका रुग्णालयावर प्रचंड मोठा ताण असून पालिकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवांमध्ये गर्भवती महिलांचा इलाज, लसीकरण व रोगांवर उपाय आदी सेवा आहेत. मोठय़ा प्रमाणात सेवा देण्यामध्ये पालिका रुग्णालयावर मर्यादा येत आहेत. साथीच्या रोगांवर इलाज करण्यासारख्या कामांमध्ये या रुग्णालयाला जास्तीत जास्त भर द्यावा लागतो. याशिवाय कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय हे महानगरपालिकांमधील एक मोठे रुग्णालय असून तेथे मृतदेहांचा पंचनामा व उत्तरीय तपासणी केली जाते. या शासकीय रुग्णालयात दिल्या जाणारी गोष्टीही पालिकेच्या रुग्णालयात चालू आहेत. हे रुग्णालय सध्या अद्ययावत करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. हे रुग्णालय राज्य शासनाने चालवावयास घेतल्यास त्यातून चांगल्या सुविधा मिळू शकतील यासाठी प्रयत्न केला जात आहे.
-’दीपेश म्हात्रे, शिवसेना

 

घनकचरा व्यवस्थापन

कचऱ्याची समस्या गंभीर

कल्याण व डोंबिवलीमधील कचऱ्याची समस्या वाढत आहे. घंटागाडीच्या अनियमिततेत भर पडली आहे. तसेच, शहरातील क्षेपणभूमीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास होत आहे. त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढीस लागल्या आहेत. कचऱ्याच्या समस्येला आम्हाला रोजच सामोरे जावे लागते. त्यावर कायमस्वरूपी उपाय कधी योजणार आहात?
-’चेतन पाटील, बिर्ला महाविद्यालय, मनोज नांगरे, बिर्ला महाविद्यालय्

कचऱ्याला शिवसेनाच जबाबदार

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने कचऱ्याची समस्या सोडवणार असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कचऱ्याचा प्रश्न सोडविलेला नाही. सध्या शहरात कचऱ्याच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून याला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही ते हेच आश्वासन देत असतील तर ही दिशाभूल आहे.
-’राकेश मुथा, काँग्रेस

 

क्रीडाविषयक धोरण..

पारंपरिक खेळांनाच वाव

कल्याण-डोंबिवलीमध्येही खो-खो व कबड्डी या क्रीडा प्रकारांनाच राजकीय पक्षांकडून महत्त्व दिले जाते. यामुळे अन्य खेळांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. या अन्य खेळांच्या व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळला असून यात खासगी क्रीडा असोसिएशन्स व राजकीय पक्षांचा समावेश आहे. तरी, या गोष्टी टाळून पालिकेमार्फत आपण क्रीडा धोरण राबवणार आहात का?
-’स्वप्निल शिरसाठ, आरकेटी महाविद्यालय

खेळ वाचविण्यासाठी आम्ही आंदोलने केली

सत्ताधारी शिवसेनेला क्रीडा प्रकारांत रस नाही. मात्र, आम्हाला या क्रीडा प्रकारात रस असून पालिकेचा तरण तलाव अनेक वर्षे बंद होता, तो आम्ही आंदोलन करून सुरू केला. उलटपक्षी शिवसेनेने बांधकाम व्यावसायिकांना शरण जात मॉल उभा केला, त्यांना आरक्षित भूखंड दिले. आम्ही सत्तेत आल्यास प्रथम स्टेडियमचा प्रश्न मार्गी लावू.
-’सुनील प्रधान, मनसे

 

वाहतूक समस्या

वाहतूक समस्येवर तोडगा काढा

डोंबिवली आणि कल्याणमधील वाहतुकीच्या समस्येवर सर्वप्रथम तोडगा काढणे आवश्यक आहे. शहरात असून नसलेली सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष या प्रश्नांकडे एकाही राजकीय पक्षाने लक्ष दिलेले नाही. त्यातच शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही या वाहतुकीच्या समस्येला वाढवणारी आहे. तर, निवडणुका झाल्या की या रस्त्यांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी आपल्या पक्षाकडून काय नियोजन करणार आहे.
-’सचिन राठोड, गोवेली महाविद्यालय

रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक समस्या

वाहतुकीची समस्या मोठी असून शहरात जी विकासकामे चालू आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. पुढील २० वर्षांसाठी रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्यांना तडे गेले. कामात हलगर्जीपणा झाला, चुका केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. येत्या काही दिवसांत ही कामे मार्गी लागतील.
-’दीपेश म्हात्रे, शिवसेना

 

स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय?

कल्याण-डोंबिवली स्मार्ट करणार म्हणजे सरकार नेमके काय करणार याबाबत स्पष्टता नाही. साडेसहा हजार कोटींचा निधी या शहरांसाठी कसा काय खर्च करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्मार्ट सिटीची घोषणा निवडणुकीच्या तोंडावरच नेमकी करतात, यामागे नेमकी खरी बाब काय आहे?  ’किशोर बजागे, गोवेली महाविद्यालय

स्मार्ट सिटी म्हणजे मतदारांची दिशाभूल

केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत स्मार्ट सिटींच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचे नावच नाही. तरी मुख्यमंत्री शहरात येऊन घोषणा करतात की स्मार्ट सिटी करू, राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार साडेसहा हजार कोटी रुपये कुठून आणणार आहे. त्यामुळे ही निवडणुकीपूर्वी केलेली मतदारांची दिशाभूल आहे.
-’सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस

नियोजित शहर हवे

कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिक स्मार्ट असून त्यांना स्मार्ट सिटी नव्हे तर नियोजित (प्लॅन) सिटी हवे. शिवसेनेच्या वतीने तसा प्रयत्न केला जात असून भाजपकडून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीचा प्रचार दिशाभूल करणारा आहे.
-’दीपेश म्हात्रे, शिवसेना

अत्याधुनिक म्हणजेच स्मार्ट

शहरात अत्याधुनिक सुखसोयी, मोठी रुग्णालये, मोठे रस्ते, सुनियोजित पाणी व्यवस्थापन आदींच्या माध्यमातून विकास करणार आहोत. शहर अत्याधुनिक करणे म्हणजेच स्मार्ट करणे होय.
-’रितेश फडके, भाजप

 

काँग्रेस-राष्ट्रवादी

कुठे कमी पडले?

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे गेले अनेक वर्षे राज्य व केंद्रात सत्तेत होते. या काळात सेना-भाजपपेक्षा गावा-गावांत काँग्रेस व राष्ट्रवादीचा बोलबाला होता. मात्र, नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे याच गावा-गावांत काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचे बोलले गेले. यामुळे तुमचा पराभव झाला असे वाटत नाही का?
-’विराज सहस्रबुद्धे

धोरण काय आहे?

काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर आता पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी काय योजना केली आहे. कल्याण-डोंबिवलीत तुमचा आवाज क्षीण असताना विकासाचे काय धोरण घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार आहात?
-’अमित भोसले

मार्केटिंगमध्ये कमी पडलो

काँग्रेसने सत्तेत असताना मुंबईत मेट्रोची सुरुवात केली, लोकांच्या आरोग्यासाठी राजीव गांधी योजना अमलात आणली, संजय गांधी निराधार योजना राबविली. मात्र, या सगळ्या योजनांचे यश आम्ही जनतेत घेऊन जाण्यास अपयशी ठरलो. आम्ही आमचे मार्केटिंग करू शकलो नाही. मात्र, या निवडणुकीत सेनेच्या अकार्यक्षमतेविरोधात आवाज उठवीत शहर विकासाचा जाहीरनामा सादर करून मतदारांपुढे जाणार आहोत.
-’राकेश मुथा, काँग्रेस

नकारात्मक मार्केटिंग केले

भाजपने आमच्यातील काही त्रुटींचा बागुलबुवा उभा केला. त्यांच्याप्रमाणे माध्यमे व समाजमाध्यमे यांवर आधुनिक प्रसिद्धी तंत्राचा वापर करून प्रचार करण्यात कमी पडलो. उलटपक्षी विरोधकांनी आमचे निगेटिव्ह मार्केटिंग केले. या वेळी कल्याण-डोंबिवलीचा विकास हे एकमेव धोरण ठेवूनच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत.
-’सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस

 

पाणी व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष आवश्यक

कल्याण-डोंबिवली या शहरांचा आकार वाढत चालला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामागे पालिकेच्या पाणी व्यवस्थापनाचा अभाव दिसून येतो. तसेच अवैध नळ जोडण्या, पाण्याची गळती या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. त्यामुळे आजपर्यंत पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष न दिलेल्या पालिकेने व राजकीय पक्षांनी निवडणुकांनंतर पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून नेमक्या काय उपाययोजना सुरू आहेत.
– शौनक फणसाळकर, कल्याण</strong>

पाण्यासंदर्भात ठोस भूमिका काय?

पाण्याची समस्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असून त्याबाबतची भूमिका राजकीय पक्षांनी स्पष्ट करावी. पाइपलाइन फुटणे, कमी दाबाने पुरवठा या समस्या नित्याचीच बाब झाली आहे. यामागची ठोस भूमिका विशद करावी.
– मनोज नांगरे, कल्याण

 

पर्जन्य जलसंचय आवश्यक

शहरातील पाण्याची समस्या जाणून ती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सोडवण्याचाच आजवर महापालिकेने प्रयत्न केला आहे, यात शंका नाही. मात्र वाढत्या शहराची पाण्याची तहान मोठी आहे, त्यामुळे इथून पुढे पर्जन्य जलसंचय योजनेचा अवलंब हा प्रत्येक इमारतीत केला तर लोकांना पाण्याचा चांगला स्रोत उपलब्ध होईल. बहुतेक इमारतींवर पत्रे  असल्याने दीर्घकालीन उपाययोजना म्हणून करण्यास इथून पुढे पालिका तयार राहील. नवी मुंबईला ज्या पद्धतीने स्वतंत्र धरण आहे. त्यानुसार कोंढाणे धरण कल्याण-डोंबिवलीसाठी विभागीय पद्धतीने सुरू व्हावे यासाठीचा ठराव दोन वर्षांपूर्वी पाठविला आहे.  कल्याण-डोंबिवलीला ६०० एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी त्यात केली आहे.
– दीपेश म्हात्रे, शिवसेना

 

मनसेकडे एकहाती सत्ता म्हणजे काय?

मनसेकडे एकहाती सत्ता द्या म्हणजे संपूर्ण विकास घडवू. म्हणजेच नेमके काय आम्हा तरुणांना कळलेले नाही. नाशिकचे मॉडेल सांगून कल्याण-डोंबिवलीचा विकास होणार आहे तर मग गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या २७ नगरसेवक व दोन आमदारांनी शहरात बदल का नाही केला. तसेच, आता या निवडणुकीत यापैकी बऱ्याच जणांनी पक्ष का सोडला.
’चेतन पाटील, बिर्ला महाविद्यालय

मराठी माणसांचा विश्वास गमावला

मराठी माणसाच्या मतांचा जागर करून मनसेने केलेली प्रगती आता ओसरू लागली आहे. अनेक जण पक्ष सोडून चालले आहेत. मनसेला उतरती कळा लागल्याचे दिसते. मनसेने मराठी माणसांवरचा विश्वास गमावला, असे तुम्हांला वाटत नाही का?
-’मनोज नांगरे, बिर्ला महाविद्यालय

या वेळच्या परिस्थितीमध्ये फरक

गेल्या वेळीची महानगरपालिका व विधानसभा निवडणूक व आजची निवडणूक यात फरक आहे. आम्हांला नाशिकमध्ये सत्ता मिळाल्यानंतर गोदापार्क, बोटॅनिकल गार्डन, मैदाने असे प्रकल्प आम्ही यशस्वी केले आणि याच जोरावर आम्ही कल्याण-डोंबिवलीची संपूर्ण सत्ता मागत आहोत. कारण, येथील नागरिक समाधानी नाहीत, येथील बांधकाम व्यावसायिक शहराला ग्रहण लावत आहेत. त्यामुळे या वेळी आम्हांला पूर्ण सत्ता द्या.
– ’सुनील प्रधान, मनसे  

 

शिवसेना-भाजप

युतीने काय विकास साधला?

पालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी समन्वयाने आजवर विकास का केला नाही. या दोन्ही पक्षांना विरोधकांचा विरोध नसतानाही हा विकास झालेला नाही, त्यामुळे हे पक्ष काय करीत होते, असा प्रश्न आम्हांला सतावत आहे. शिवसेना-भाजपने आता तरी यामागची भूमिका स्पष्ट करावी.
-’ किशोर बजागे, गोवेली महाविद्यालय

बहुमत न मिळाल्यास युती करणार का?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना व भाजप एकमेकांविरोधात विखारी प्रचार करीत आहेत. हा प्रचार अगदी वैयक्तिक पातळीवरही येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता सेना-भाजप स्वतंत्र लढत आहेत, मात्र निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्यास युती करणार का?
-’सुमित भोईर, गोवेली महाविद्यालय

शिवसेनेने फरफट केली

भाजप नेहमीच विकासाचे राजकारण करते. आमची यापूर्वी अनेकदा शिवसेनेने फरफट केली. इतके दिवस पालिकेत यांचीच सत्ता होती, तेव्हा त्यांनी शहर विकास करण्याची संधी होती. मात्र, कल्याण-डोंबिवलीचा विकास आजवपर्यंत होऊ शकला नाही. या सत्तेत शिवसेनेने आमची फरफट केली.
-’रितेश फडके, भाजप

भाजपची भूमिका सोयीनुसार

गेली पंधरा वर्षे पालिकेत असलेली सत्ता ही शिवसेनेची नसून ती सेना-भाजप युतीची सत्ता होती. मात्र, आज निवडणुकीदरम्यान चांगली कामे केली ती युतीची, मात्र वाईट कामे ही शिवसेनेची ही भाजपची भूमिका सोयीनुसार घेतलेली आहे. मात्र बहुमत मिळाले नाही तर युतीचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठीच घेऊ शकतील.
-’दीपेश म्हात्रे, शिवसेना