मलाबार ट्री निम्फ हे निम्फेलिडे कुळातील डॅनाईडे समूहातील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू जवळपास संपूर्ण दक्षिण भारतात आणि त्यातही केरळ, कर्नाटक राज्यांच्या सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये आढळते. त्यामुळेच यांना मलाबार ट्री निम्फ हे नाव देण्यात आले आहे. असे असले तरी आपल्या कोकणातील डोंगरांमध्येही ही फुलपाखरे हमखास दिसतात, मात्र दक्षिण भारतातील आपल्या भावंडापेक्षा ती लहान असतात. मलाबार ट्री निम्फ हे जवळपास १५० मि.मी. आकाराचे मोठे फुलपाखरू आहे. याचे पंख पांढरे असून पंखांच्या वाहिन्या या काळ्या रंगांच्या असतात.पुढच्या पंखांच्या वरच्या बाजूस मध्यावर दोन काळे मोठे ठिपके असतात. त्याचप्रमाणे पंखांच्या कडेला अगदी किनारीपाशी काळ्या पोकळ वर्तुळांची माळ दोन्ही पंखांवर असते. शिवाय या माळांच्या आत काही अंतरावर भरीव काळे ठिपके पंखांवरच्या वाहिन्यांनी बनलेल्या प्रत्येक कप्प्यांत असतात.इतर डॅनाईडे फुलपाखरांप्रमाणेच ही फुलपाखरेसुद्धा विषारी असतात. या फुलपाखरांचे सुरवंट हे नागलकुडासारख्या झाडांची पाने खाऊन वाढतात. या पानांमध्ये असणाऱ्या चिकामधून ही विषारी द्रव्ये सुरवंटाच्या शरीरात भिनतात, या विषामुळेच भक्षक त्यांच्या वाटेला जात नाहीत. हे एक प्रकारचे संरक्षक कवचच निसर्गाने त्यांना दिले आहे.या फुलपाखरांचे पुढचे पंख निमुळते आणि लांबीला जास्त असतात, तर मागचे पंख हे रुंद गोलाकार असतात. पंख पसरल्यावर पुढचे दोन्ही पंख सरळ रेषेत राहतात आणि मागच्या रुंद पंखांमुळे त्यांना विशिष्ट असा आकार मिळतो, त्यामुळे तसेच हवेत संथ लयीत तरंगण्याच्या यांच्या सवयीमुळे यांना पेपरकाइट म्हणजेच पतंग असेही नाव मिळाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 9, 2016 1:52 am