अवाजवी दराने कंत्राटदाराकडून रोपेखरेदी; वाटलेल्या रोपांबाबत पालिका अनभिज्ञ

बदलापूर : राज्यातील वनक्षेत्र तसेच हिरव्या पट्टय़ात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा गैरफायदा घेऊन यातून आपले खिसे भरण्याकडे कल वाढत असल्याचे बदलापुरातून दिसून आले आहे. या वृक्षारोपणासाठी वनविभागाकडून अतिशय माफक दरात रोपे मिळत असताना ती जवळपास दहापट दराने कंत्राटदाराकडून खरेदी करण्यात आल्याचे उघड होत आहे. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश रोपांची लागवड झाली का आणि ती जिवंत आहेत का, याबाबत प्रशासकीय यंत्रणांकडे माहितीच नाही.

राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून दरवर्षी १ जुलै रोजी कोटय़वधी झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात येते. यंदाही १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात किती झाडे लावली गेली आणि त्यातील किती झाडे प्रत्यक्षात जगली या आकडय़ांच्या खेळात प्रचंड तफावत दिसून आली आहे. कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रातही वृक्षारोपणाच्या नावाखाली फक्त आकडय़ांचा खेळ केला जात असल्याचे समोर आले आहे. २०१७ या वर्षांत कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १६ हजार ५४३ रोपे मागवण्यात आली होती असे कागदोपत्री नमूद आहे. त्यातील ८ हजार झाडे ही ६, ११ आणि २५ रुपये प्रति झाडाप्रमाणे वनविभागाला अदा करण्यात आले. तर उरलेली झाडे कंत्राटदाराकडून खरेदी करण्यात आली. मात्र, यासाठी कंत्राटदाराने १११ रुपये प्रतिरोप असा दर आकारला. याचाच अर्थ वनविभागाने आकारलेल्या दरापेक्षा दहापट अधिक दराने कंत्राटदाराकडून रोपखरेदी करण्यात आली.

एकूण आणलेल्या झाडांपैकी ५ हजार ७९३ झाडे नागरिक आणि संस्थांना वाटण्यात आली. ती सध्याच्या घडीला कोणत्या स्थितीत आहेत, याची पुरेशी माहिती नाही तर पालिकेने शहरातील पाच ठिकाणी प्रत्यक्षात १० हजार ७५० झाडे लावली, अशी कागदोपत्री नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील अवघी काही झाडेच सध्या जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यातील एरंजाड भागात सव्‍‌र्हे क्रमांक१५ मध्ये लावण्यात आलेल्या ८५० झाडांपैकी एकही झाड जिवंत नाही तर मोहपाडा आणि कान्होर येथे लावण्यात आलेल्या ७ हजार ३५० झाडांपैकी अवघी पाचशे झाडे तग धरून आहेत. त्याच वेळी सोनिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील जागेत लावण्यात आलेली पाचशेहून अधिक झाडे चांगल्या प्रकारे वाढली आहेत. हा भाग वगळता इतर ठिकाणी वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला खरेच वृक्षारोपण करायचे आहे की वृक्षाच्या नावाखाली पैसारोपण करायचे आहे, असा सवाल उपस्थित होतो आहे.

सर्वच कामांत गैरप्रकार?

पालिका क्षेत्रात होत असलेल्या वृक्षारोपणात एका झाडामागे मोठा खर्च होतो आहे. एका रोपाची किंमत १११ रूपये असून त्यासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्डय़ासाठी ५ रूपये, त्याच्या संगोपनासाठी जाळी, कापड, पाणी मारण्याची व्यवस्था यासाठी मोठी रक्कम अदा करण्यात येते. मात्र तरीही गेल्या काही वर्षांत पालिकेकडून लावली गेलेली झाडे दिसणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या वृक्षारोपणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत आहे.

‘७० टक्के झाडे जगली’

शहरातील वृक्ष संगोपनाची अशी दारुण अवस्था असूनही मुख्याधिकारी वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. गेल्यावर्षी वृक्षारोपणावर अधिक काम केले गेले. संगोपनासाठी एक पाण्याच्या टँकरचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ६० ते ७० टक्के झाडे जगली आहेत, असा आमचा अंदाज आहे, अशी माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.