ठाणे : नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना संचित रजा घेऊन फरार झालेल्या गणेश गोगावले याला १३ वर्षांनंतर सोमवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकने अटक केली. उस्मानाबाद येथील भूम पोलीस ठाण्यात गणेशविरोधात खंडणी, अपहरण आणि दरोडय़ाचे गुन्हे दाखल आहेत.

पनवेल येथील भिंगार गाव भागात गणेश गोगावले येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकचे पोलीस हवालदार आनंद भिलारे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने १९९६ मध्ये उस्मानाबाद येथे एका वाहनचालकाचे अपहरण करून खंडणी मागितली होती. उस्मानाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

काही दिवसांनी तो संचित रजेवर गेला. मात्र कारागृहात परतला नव्हता. अखेर १३ वर्षांनंतर त्याला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले. नाशिक कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याला कळंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.